मोकाट कुत्र्यांचा एकलहरेत तीन बालकांवर हल्ला

बालके गंभीर जखमी, महापालिकेला ग्रामस्थांचा इशारा

नाशिकरोड : प्रतिनिधी
एकलहरे परिसरात अनेक दिवसांपासून महानगरपालिका विभागाचे कर्मचारी शहरातील मोकाट कुत्री रात्रीच्या वेळी सोडून देत असल्याने पादचारी नागरिकांच्या अंगावर ही मोकाट कुत्री हल्ला करत आहेत. गुरुवारी या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात चरण पटाईत (वय 7), वेदांत अहिरे (6), स्वरांश पगारे (वय 3) ही बालके गंभीर जखमी झाली आहेत. बिटको रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले आहे.


महानगरपालिकेने तातडीने ग्रामीण भागात कुत्री सोडणे थांबवावे, अन्यथा हीच मोकाट कुत्री पुन्हा एकलहरे ग्रामस्थांच्या वतीने पकडून मनपा आयुक्ताच्या निवासस्थानी सोडू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.
सकाळच्या सुमारास चौकाचौकांत नागरिकांची कोणत्या ना कोणत्या कारणात्सव गर्दी असते. त्यातच गुरुवारी अचानक मोकाट कुत्र्याच्या टोळीने बालकांवर जीवघेणा हल्ला केला. ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्री आली कुठून? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
महानगरपालिका प्रशासनाला अनेकदा शहरातील पकडलेली मोकाट कुत्री ही रात्रीच्या वेळी संबंधित विभागाचे कर्मचारी ग्रामीण भागातील पळसे, शिंदे, साखर कारखाना, चांदगिरी व वडगाव पिंगळा असा ठिकाणी सोडून देत निघून जातात. गुरुवारी तीन बालकांवर हल्ले झाल्यानंतर ग्रामस्थांचा संयम सुटला आहे. एकलहरे ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नाशिकरोड मनपाचे विभागीय अधिकारी डॉ. प्रज्ञा त्रिभुवन यांना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त शहरातच करण्यासाठी निवेदन दिले. त्यास डॉ. त्रिभुवन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ठोस कार्यवाही न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. शिष्टमंडळामध्ये सामनगावचे ग्रामपंचायत सदस्य किशोर बागूल, किशोर पगारे, मनोज अहिरे, सोनू शिंदे, किसन पटाईत, नवनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

Stray dogs attack three children in Eklahar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *