दिवसाढवळ्या बिबट्याचा फेरफटका

नांदूरशिंगोटे-नळवाडी शिवारात भीतीचे वातावरण

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील नांदूरशिंगोटे, नळवाडी आणि भोजापूर खोरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर चांगलाच वाढला आहे. दिवसाढवळ्या शेतशिवारात बिबट्या दिसू लागल्याने शेतकरी, शेतमजूर आणि गावकर्‍यांमध्ये भीती पसरली आहे. शेतात काम करताना आता चारही बाजूंनी नजर ठेवावी लागते, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
नळवाडी शिवारात सोमवारी बिबट्याची जोडगोळी दिवसा शेतात फिरताना तसेच डोंगराच्या पायथ्याशी आराम करताना दिसली. हे दृश्य काही नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपले असून त्याची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे. नांदूरशिंगोटेसह चास, कासारवाडी, सोनेवाडी शिवारातही जवळपास रोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी आदी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांना दिवस-रात्र शेतात जावे लागत आहे. मात्र बिबट्याच्या भीतीमुळे अनेकजण एकटे शेतात जाणे टाळत आहेत.
काही ठिकाणी तर मजूरच शेतात येण्यास नकार देत असल्याने शेतीकामे खोळंबली आहेत. या परिसरात बिबट्याने पाळीव प्राण्यांवरही हल्ले केले आहेत. शेळ्या, मेंढ्या, वासरू, कुत्रे, मांजरे यांना बिबट्याने फस्त केल्याच्या घटना घडल्याने गावकर्‍यांची चिंता आणखी वाढली आहे. नळवाडीतील नागझरी ओढा व रायदुर्ग परिसरात बिबट्याचा वारंवार वावर दिसून येत आहे. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर संबंधित भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

दुचाकीस्वाराला बिबट्याचे दर्शन

दोन दिवसांपूर्वी नांदूरशिंगोटे येथील बोगदेवाडीजवळील कालव्यालगत रात्री आठच्या सुमारास शेतीला पाणी भरण्यास जात असताना कैलास बर्के यांच्या दुचाकीसमोर अचानक बिबट्या आडवा गेल्याने भीतीने गाळण उडाली. त्याच रात्री काही आदिवासी बांधवांनाही बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराट उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *