उडान फाउंडेशनचे बालशौर्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूरची आन्वी, पालघरचा मयंक आणि संगमनेरचा कृष्णा पुरस्काराचा मानकरी

सिन्नर : प्रतिनिधी
उडान फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा 2025 चा राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्कार कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज विद्यालयाची आन्वी अनिता चेतन घाटगे (वय 6), पालघर जिल्ह्यातील आदर्श विद्यालय, उटावली येथील मयंक विष्णू कुवरा (वय 10) आणि संगमनेर येथील अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचा कृष्णा सचिन वडनेरे (वय 6) यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती उडान फाउंडेशनचे अध्यक्ष भरत शिंदे यांनी दिली.
अठरा वर्षांखालील मुलांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा अथवा इतरांचा प्राण वाचविला असेल किंवा एखाद्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असेल, अशा बालकांचा सन्मान करण्यासाठी गेल्या सात वर्षांपासून उडान फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जात आहे. आतापर्यंत या पुरस्काराने सन्मानित झालेल्या बालकांपैकी दोन बालकांना पुढे राष्ट्रपती बालशौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून रविवार, दि. 12 जानेवारी रोजी सिन्नर नगरपालिकेच्या लोकशाहिर अण्णा भाऊ साठे सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला कर्नल सचिन सिरसाठ, विभागीय आयुक्त चंद्रशेखर पगारे, नगराध्यक्ष विठ्ठल उगले, जिल्हा बालविकास अधिकारी सुनील दुसाने, ज्येष्ठ उद्योजक किशोर राठी आणि शिवाजी बाविस्कर उपस्थित राहणार आहेत.

 आन्वी चेतन घाटगे
अत्यंत कमी वयात महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडूतील अनेक डोंगरशिखरे सर करत, तसेच हिमालयातील केदारकंठ शिखरावर यशस्वी चढाई करून आन्वीने विशेष कामगिरी केली आहे.

 

 

 

मयंक विष्णू कुवरा
शाळेतून घरी जात असताना अचानक वाघाने हल्ला केला असता, मयंकने प्रसंगावधान राखत दप्तराच्या सहाय्याने प्रतिकार करून स्वतःचा प्राण वाचविला.

 

 

 

कृष्णा सचिन वडनेरे
मित्रांसोबत खेळत असताना मित्र पाण्याच्या टाकीत पडला असता, क्षणाचाही विलंब न करता कृष्णाने टाकीत पाइप टाकून मित्राला बाहेर काढत त्याचा जीव वाचविला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *