मतदान केंद्र गावाबाहेर; ग्रामस्थांचा ठिय्या

मालेगाव मनपा निवडणूक; मतदानाची गावातच सोय गरजेची

मालेगाव : प्रतिनिधी
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक चारमधील सायने गावातील मतदान केंद्राच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. सायने गावातील एक मतदान केंद्र देवीचा मळा येथील अल-हरा शाळेत वर्ग केल्याने संतप्त मतदार व ग्रामस्थांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले. मतदानाची सोय गावातच असावी, या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत.
सायने गावात सुमारे 3,300 मतदार असून, मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान केंद्रे गावातच होती. महापालिका निवडणुकीसाठी चार मतदान केंद्रे निश्चित केली होती, मात्र सुरुवातीला ही सर्व केंद्रे गावापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर ठेवल्याने नाराजी पसरली. आंदोलनानंतर तीन केंद्रे गावात स्थलांतरित केली असली तरी एक केंद्र अद्यापही देवीचा मळा येथेच असल्याने ग्रामस्थांचा संताप कायम आहे.
देवीचा मळा हा जुना मुंबई-आग्रा महामार्गावर असून, येथे मोठी वाहतूक आणि पुलाचे काम सुरू असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उर्वरित मतदान केंद्र तत्काळ सायने गावात स्थलांतरित न केल्यास महापालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी सायनेचे माजी सरपंच प्रवीण मगरे यांच्यासह अशोक शिंदे, विशाल अहिरे, रवींद्र बच्छाव, रहमान मन्सुरी, जाकीर खान, सागर रौंदळ, चेतन रौंदळ, हर्षल बच्छाव, दुर्गेश पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

Polling station outside the village; villagers’ protest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *