गावठाणातील मतविभागणीचा फटका कोणाला?

प्रभाग 2 मध्ये प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य अशी लढाई; 4 जागांसाठी 25 उमेदवार रिंगणात

पंचवटी : सुनील बुनगे
आडगाव, नांदूर, मानूर गावठाण आणि मोठ्या प्रमाणात विविध नगरांचा समावेश असलेल्या परिसरातील प्रभाग दोनमध्ये आडगाव परिसरातील उमेदवार सर्वाधिक असून, या गावांतील मतदान विभागले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, विडी कामगारनगर, जत्रा हॉटेल परिसर आदी नगरांमधील मतदान कोणाला तारणार आहे. विशेष म्हणजे, भाजपचे मुख्य उमेदवार माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे हे धोत्रे खून प्रकरणात कारागृहात असल्याने त्यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी दिली असून, भाजपच्या प्रस्थापित उमेदवारांच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने यावेळी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना उबाठा यांचे तीन पॅनल झाले आहेत.तर 4 जागांसाठी एकूण 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
प्रभाग क्रमांक दोनमध्ये (अ) अनुसूचित जाती महिला गटातून 7, (ब) अनुसूचित जमाती महिला गटातून 3, (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग गटातून 7, (ड) सर्वसाधारण गटातून 8 असे एकूण 25 इतके उमेदवार आहेत. या प्रभागात सुरुवातीला शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांचे नगरसेवक राहिले आहेत. त्यानंतर उद्धव निमसे भाजपात गेल्याने भाजपचे चारही नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे भाजपचे वर्चस्व झाले होते. यावेळची निवडणूक ही अतिशय वेगळ्या वळणावर गेली आहे. ऐन निवडणुकीच्या आधी पोळ्याच्या दिवशी नांदूर नाका परिसरात किरकोळ कारणावरून वाद होऊन त्यात राहुल धोत्रे याचा खून झाल्याची घटना घडल्याने या भागातील वातावरण बदलून गेले. या घटनेला माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांना जबाबदार धरत त्यांना कारागृहाची हवा खायला लागली असल्याने तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत. त्यामुळे त्यांनी तुरुंगातून निवडणूक लढवू, असे सांगितले. मात्र, त्यांनी या निवडणुकीत त्यांचा मुलगा रिद्धीश याला उतरवले आहे. यावेळी निवडणुकीत माजी नगरसेवक सुरेश खेताडे यांनी महिलेसाठी जागा असल्याने त्यांची पत्नी इंदुबाई खेताडे यांना निवडणुकीत उतरवले आहे. माजी नगरसेविका पूनम सोनवणे यांना भाजपने उमेदवारी नाकारली आणि ती उमेदवारी ऐश्वर्या लाड (जेजुरकर) यांना दिल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली आहे. तर माजी नगरसेविका शीतल माळोदे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी निवडणुकीतून बाजूला राहणे पसंत केले. त्यामुळे या निवडणुकीत जास्त नवखे उमेदवार आहेत. भाजपकडून ऐश्वर्या लाड (जेजुरकर), इंदुबाई खेताडे, रिद्धीश उद्धव निमसे, अ‍ॅड. नामदेव शिंदे यांचे एक पॅनल आहे. तर शिवसेना शिंदे गटाने अश्विनी बागूल, कविता अंडे, रामभाऊ जाधव आणि भाऊसाहेब निमसे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अश्विनी बागूल आणि कविता अंडे यांनी त्या पॅनलमधून बाहेर पडत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट अशी युती केल्याने राष्ट्रवादीचे अतुल मते व रवींद्र जाधव यांचे एक पॅनल होऊन ते भाजपशी दोन हात करत आहेत. रामभाऊ जाधव व भाऊसाहेब निमसे यांच्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मतांची विभागणी होणार आहे. शिवसेना (उबाठा) मथुरा गांगुर्डे, मनीषा बागूल, वैभव ठाकरे, बालाजी माळोदे असे पॅनल आहे. मनीषा भुजबळ या वंचित बहुजन आघाडीकडून तर वीणा गायकवाड (साबळे), अपक्ष प्रमिला जाधव, पूनम सोनवणे या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तसेच रोहित विशे, मीनाक्षी काकळीज, संकेत निमसे हेही अपक्ष निवडणूक लढवत आहेत. रेखा तांबे (राजोळे), वंचित बहुजन आघाडीकडून आकाश आमले, शोभा निमसे, शुभम मगर हेही अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावत आहेत.

Who is affected by the division of votes in the village?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *