संशयित मानकरला अटक; सोने व्यापार्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
घोटी : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर फेरी मार्गावर घडलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी अटक केलेल्या सात आरोपींपैकी एक आरोपी हा घोटीतील एका प्रसिद्ध सोन्याच्या दुकानात काम करत असल्याचे तपासात उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. दरोड्यातील सोन्याचा माल संशयित आरोपी त्या सोन्याच्या दुकानात कामाला असलेल्या रवींद्र मानकरकडे देत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे घोटीतील सोने व्यापार्यांकडून चोरीचा माल स्वीकारला जातो का, अशी जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
याप्रकरणात एकनाथ ऊर्फ नवनाथ सुक्रा गुंड (वय 32), वैभव रघुनाथ झोळे (वय 19), चेतन रामदास गुंड (वय 21), अमोल जनार्दन गुंड (वय 21), पांडुरंग रघुनाथ जाधव (वय 23), अनिल सुरेश जाधव (वय 21) आणि रवींद्र नामदेव मानकर (वय 33) या सहा संशयितांना अटक केली आहे. संशयित आरोपींना 21 जानेवारी 2026 ला अटक केली होती, तर संशयित रवींद्र मानकर याला 27 जानेवारी 2026 ला घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिस तपासानुसार, रवींद्र मानकर घोटीतील एका प्रसिद्ध सोन्याच्या दुकानात काम करत होता. दरोड्यानंतर संशयित आरोपी चोरीतील सोन्याचा माल त्याच्याकडे देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घोटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. या कारवाईनंतर घोटी शहरात सोने व्यावसायिकांकडून चोरीचा माल स्वीकारला जातो का, असा प्रश्न उपस्थित होत असून, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
सातही आरोपींना न्यायालयीन कोठडी
दरोड्याची घटना 16 जानेवारी 2026 ला पहाटे 4.30 ते 5.00 वाजण्याच्या सुमारास त्र्यंबकेश्वर फेरी मार्गावर गौतमऋषी मंदिराजवळ घडली होती. फिर्यादी व साक्षीदारांना रस्त्यात अडवून काळा पदार्थ
फेकून लाकडी काठ्यांनी मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइल असा सुमारे 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने, मणीमाळ, रोख रक्कम, मोबाइल फोन, सीमकार्ड तसेच दरोड्यासाठी वापरलेले हत्यारे जप्त केली आहेत. गुन्ह्याची चौकशी पूर्ण झाल्याने आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली असता न्यायालयाने सातही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Selling the looted goods to a goldsmith in Ghoti?