जनसेवा, अटल फाउंडेशनचा अल्टिमेटम; तीव्र आंदोलनाचा इशारा

ठाणगाव : वार्ताहर
सिन्नर ते ठाणगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, येत्या 22 तारखेपर्यंत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास ठाणगाव, डुबेरेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात जनसेवा सेवाभावी संस्था व आढळ फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार सुरेंद्र देशमुख व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. सिन्नर -ठाणगाव अंदाजे 22 किलोमीटरचा रस्ता आहे. ठाणगावसह आटकवडे, डुबेरे, डुबेरेवाडी, टेंभूरवाडी, हिवरे, पिंपळे, पाडळी, आडवाडी यांसह अकोले तालुक्यातील बर्याचशा गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. सिन्नर एमआयडीसी, नाशिक येथे जाण्या-येण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. तसेच समशेरपूर, विश्रामगडाकडे दूरदूरचे पर्यटक भेटी देण्यासाठी येत असतात. दररोज मोठ्या संख्येने दुचाकी, चारचाकी वाहने या रस्त्यावरून प्रवास करतात. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक वेळा रस्त्याच्या नूतनीकरणासाठी व दुरुस्ती व रुंदीकरणासाठी डुबेरे येथील नागरिकांनी माजी सरपंच ज्ञानेश्वर ढोली यांच्या समवेत वेळोवेळी आंदोलन करून
मागणी केलेली आहे. निवडणुका आल्या की सिन्नर-ठाणगाव रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण, काँक्रिटीकरण केले जाईल, असे आश्वासन देऊन मतदान घेतले जाते. मात्र, निवडणुका संपताच संपूर्ण रस्त्याचे काम केले जात नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. सिन्नर-ठाणगाव रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावलेले आहे तसेच अनेक नागरिक कायमस्वरूपी जायबंदी झालेले आहेत.
या रस्त्यावरून दररोज प्रवास करणार्या अनेक नागरिकांना मान, पाठ, कंबर असा शारीरिक वेदनेचा त्रास सुरू झाला आहे. तसेच वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. सिन्नर-ठाणगाव संपूर्ण रस्त्याच्या रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण करण्यासाठी ठाणगाव येथील जनसेवा संघाचे अध्यक्ष रामदास भोर यांनी वेळोवेळी आंदोलन करून शासनाला निवेदन दिलेले आहे. सिन्नर-ठाणगाव या संपूर्ण रस्त्याचे काम त्वरित सुरू करून पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली असून, 22 तारखेपर्यंत काम सुरू न झाल्यास डुबेरे येथे मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी रामदास भोर, शिवसेना तालुकाध्यक्ष गणेश शिंदे पाटील, ठाणगावचे उपसरपंच विलास मोरे, आशापूरचे सरपंच दीपक पाटोळे, माजी सरपंच कचरू नाना पाटोळे, बाळासाहेब शिंदे, केरू शिंदे, शिवाजी पाटोळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Repair Sinnar-Thangaon road immediately