न्याहारी डोंगरावर वणवा; आग लावल्याचा संशय

वनविभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी

दिंडोरी : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील वन परिसरात डोंगरांना वणवा लागण्याच्या घटनांचे सत्र काही थांबता थांबेना, रोज वेगवेगळ्या ठिकाणी वणव्यांच्या घटना घडत आहेत. त्यात शुक्रवारी (दि. 6) सकाळी साडेनऊच्या सुमारास दिंडोरीजवळील वनपरिक्षेत्रात असलेल्या न्याहारीमाता डोंगराला अज्ञात इसमाकडून आग लावण्यात आली. ही घटना स्थानिक युवक ऋतिक कदम यांच्या लक्षात आली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ स्थानिक परिसरात वृक्षारोपण करणारे भाऊसाहेब चव्हाणके यांच्याशी संपर्क केला. त्यांनी तात्काळ वन विभाग व स्थानिक परिसरातील नागरिकांना कळवले. वैयक्तिक कामकाजाला फाटा देत बरोबर आणलेल्या ओल्या बारदानांची पोती घेऊन व मिळेल त्या साधनांचा वापर करून वन परिसरात लागलेला वणवा विझवण्यात आला. हे सत्र वारंवार घडत आहे. त्यामुळे वन विभागाने यासंदर्भात योग्य ती पावले उचलावीत, अशी परिसरातून मागणी होत आहे. मागील आठ वर्षांपासून भाऊसाहेब चव्हाणके व परिवार या डोंगराच्या परिसरात वृक्षारोपण व संगोपनाचे काम करत आहेत. डोंगरांना वणवा का लागला, कुणी लावला, या सार्‍या प्रश्नांची उकल कालपरत्वे होईल की नाही, पण ही जैवविविधतेची हानी भरून निघणार नाही. स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन हे संकट शमवावे हा एकच पर्याय या मानवनिर्मित प्रश्नाला आहे. गावांनी आपापल्या राखीव वनात जाळपट्टे जानेवारी महिन्यात करून ठेवावे. त्यामुळे अनेक जीवांचा आणि त्यासोबत आपल्या परिसरातील पर्यावरणाचा श्वास जिवंत राहील. सर्वच जबाबदारी ठराविकांची किंवा वन विभागाची नाही, माणूस म्हणून आपलीही नैतिक जबाबदारी ओळखली पाहिजे, तरच पर्यावरण बदलाला थांबवू शकतो. वणवा विझवण्यास मदत करणार्‍या सर्व सहभागी नागरिकांचे वन विभागामार्फत आभार व्यक्त केले. यात भाऊसाहेब चव्हाणके, ऋतिक कदम, विकास कदम, रुद्राक्ष चव्हाणके, प्रथमेश भालेकर, वन विभागाचे वनरक्षक योगेश दळवी, खुशाल गांगोडे, बापू शिरसाट, सचिन गांगोडे आदींनी सहभाग घेतला होता.

Wildfire breaks out on breakfast mountain; Arson suspected

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *