♦ भाजप-शिंदेसेना एकत्र; शिंदेसेनेला उपमहापौरपद
♦ उद्धवसेनेच्या माघारीमुळे निवडणूक बिनविरोध
कुंभमेळ्यासाठी सर्व जण एकत्रित काम करणार आहेत. शहराच्या विकासाबरोबरच कुंभमेळाही यशस्वीरीत्या पार पाडण्याचे महत्त्वाचे काम आहे. नाशिक पुण्यनगरी असून, मिळालेली ही संधी नसून, तर सेवेची पर्वणी आहे. त्यामुळे प्रत्येक घरात राम पोहोचवायचा असून, संपूर्ण शहरात विकासाची कामे सर्वांना सोबत घेऊन करणार आहोत.
-हिमगौरी आडके-आहेर, महापौरशहरात दीर्घकालीन विकास करायचा आहे. यात पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, तसेच भाविकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर विशेष भर दिला जाईल. कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराचा केवळ तात्पुरता नव्हे, तर दीर्घकालीन विकास करून दाखवू.
-विलास शिंदे, उपमहापौर
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके-आहेर, तर उपमहापौरपदी शिंदेसेनेचे विलास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे, 2017 मध्येदेखील बिनविरोध निवड झाली होती. त्यानुसार सलग दुसर्यांदा महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाली. भाजप-शिंदेसेना एकत्र आल्याने महापालिकेतील सत्ता दोन्ही पक्षांद्वारे चालणार आहे. परंतु, महत्त्वाची व लाभाची पदे भाजपकडेच जाणार असल्याने महापालिकेत भाजप मोठ्या भावाची भूमिका बजवणार आहे. दरम्यान, उद्धवसेनेच्या नगरसेविका सीमा पवार यांनी गटनेते केशव पोरजे यांच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने हिमगौरी आडके-आहेर बिनविरोध महापौरपदी निवडून आल्या. तर भाजपचे मच्छिंद्र सानप, शिंदेसेनेचे प्रवीण तिदमे, राहुल दिवे यांनी माघार घेतल्याने शिंदेसेनेचे सहसंपर्कप्रमुख विलास शिंदे हे बिनविरोध उपमहापौरपदी विराजमान झाले.
नाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.6) पार पडली. सर्वांत प्रथम भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक पावणेअकरा वाजता सभागृहात दाखल झाले. त्यानंतर शिंदेसेनेचे नगरसेवक टप्प्याटप्प्याने आले. तर उद्धवसेनेचे नगरसेवक शिंदेसेनेच्या नगरसेवकांनंतर दालनात दाखल झाले. दरम्यान, महापालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले भाजप-शिंदेसेना पालिकेतील एकत्र येतील, अशी चर्चा आठवड्यापासून सुरू होती. अखेर ही चर्चा खरी ठरत शुक्रवारी सकाळी शिंदेसेनेला भाजप उमहापौरपद सोडणार असल्याचे स्पष्ट झाले. सभागृहात महापौरपदाची निवडणूक पार पडल्यावर भाजपचे मच्छिंद्र सानप यांनी त्यांचा उपमहापौरपदाचा अर्ज मागे घेताच. विलास शिंदे यांचा मार्ग मोकळा झाला. भाजपकडून नगरसेवकांना अधिकृत व्हीप जारी करण्यात आला होता. त्यानुसार महापौरपदासाठी हिमगौरी आडके, तर उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु निवडणूक बिनविरोध झाल्याने याची आवश्यकताच पडली नाही. हिमगौरी आडके यांची महापौरपदी निवड होताच प्रेक्षक गॅलरीतून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. महापौर निवडणुकीच्या वेळेस 109 तर उपमहापौरवेळी सर्व 122 नगरसेवकांची नोंद केली गेली.
राज्यातील तडजोडीमुळे शिंदेसेनेला उपमहापौरपद
महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही, अशी भूमिका मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली होती. त्यानंतर शिंदेसेना आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. त्यातच राज्यातील मुंबई महापालिकेसह काही महापालिकेत भाजपला शिंदेसेनेची आवश्यकता असल्याने नाशिकमध्ये भाजपला शिंदेसेनेसोबत तडजोडी करण्याची वेळ आल्याने प्रदेश पातळीवर चर्चा होऊन उपमहापौरपद शिंदेसेनेला द्यावे लागले.
भाजप-शिंदेसेनेची विनंती उद्धवसेनेने ऐकली
भाजपकडे 72 नगरसेवकांचे तगडे संख्याबळ असल्याने महापौरपदासह उपमहापौर निवडणुकीची केवळ औपचारिकताच बाकी होती. मात्र, महापौर निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही म्हणून उद्धवसेनेच्या सीमा पवार यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु सभागृहात भाजप-शिंदेसेनेचे नगरसेवक येताच पीठासीन अधिकारी आयुष प्रसाद यांनी माघारीसाठी पंधरा मिनिटे अवधी दिला. त्यावेळी भाजपचे गटनेते अॅड. श्याम बडोदे, सुधाकर बडगुजर व शिंदेसेनेचे अजय बोरस्ते यांनी उद्धवसेनेचे गटनेते केशव पोरजे यांना त्यांच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची विनंती केली असता, पोरजे यांनी ती स्वीकारली.
Himgauri Adke elected as Mayor of Nashik, Vilas Shinde as Deputy Mayor