वाहनधारकांसह पादचार्यांचे हाल; स्थानिक व्यवसायावरही परिणाम
निफाड : तालुका प्रतिनिधी
नाशिक-छत्रपती संभाजीनगर, तसेच सुरत-शिर्डी या महामार्गावर निफाड शहरातील शांतीनगर चौफुलीवर वाहतुकीची कोंडी आता नित्याची झाली आहे. विशेषत: दर शुक्रवारी म्हणजेच आठवडे बाजाराच्या दिवशी निफाड पंचायत समिती ते शांतीनगर चौफुलीपर्यंत चालणे अवघड होते. याच गर्दीचा फायदा भुरटे महिलांचे दागिने लंपास करून पसार होत आहेत.
सध्या पिंपळस ते येवला या मार्गाचे एका बाजूने काँक्रिटीकरणाचे काम चालू असल्याने एकेरी मार्गानेच येणारी आणि जाणारी वाहने धावत असल्याने वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडत आहे. त्यामुळे निफाडची ही चौफुली आता वाहतूक कोंडीचा स्पॉट बनला असून, ही कोंडी सोडविण्यासाठी ठोस प्रयत्न होणे गरजेचे आहे. निफाडची शांतीनगर चौफुली म्हणजे निफाड शहराचे प्रवेशद्वार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सुरत, शिर्डी, सिन्नर, चांदवड, वणी पिंपळगाव, लासलगाव आदी प्रमुख शहरातील वाहने तसेच शेतमाल वाहतूक करणारी वाहने याच रस्त्याचे धावतात. तसेच निफाड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शालेय विद्यार्थी, चाकरमानी, शेतकरी यांचा या शहराशी नित्याचा संबंध येतो. सध्या विवाहमुहूर्त सुरू असल्याने परिसरात असणारी अनेक मंगल कार्यालये तसेच परिसरातील शॉपिंग सेंटर, विविध छोटी-मोठी उपनगरे, बँका, पतसंस्था, बाजार समिती, शासकीय कार्यालये आणि परिसरातील नागरिकांची रहदारीत भर पडते. गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची ही समस्या गंभीर बनली असतानाही नगरपंचायत किंवा पोलिस प्रशासनाने त्याबाबत काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. विशेष म्हणजे, या
ंचौफुलीजवळच बाजार समितीचे आवार असून, त्याशेजारी बसस्थानक, कोर्ट, शाळा यांसह शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे आधीच हा परिसर वर्दळीचा असताना आता रस्ता नूतनीकरणामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे.
निफाड शहरात प्रमुख रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे. या रहदारीचा सर्वाधिक फटका परिसरातील व्यावसायिकांना बसत आहे. यावर्षी बाजारात आर्थिक मंदी असल्याने आधीच व्यावसायिक अडचणीत आहेत. आता त्यात या वाहतूक कोंडीची भर पडत आहे. प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी त्यावर वेळीच मार्ग काढून रहदारी कायमस्वरूपी सुरळीत राहील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-संजय गाजरे, व्यावसायिक, निफाडTraffic jams are a regular occurrence on the Niphad roundabout.