केंद्राचा ऐतिहासिक निर्णय, सर्व 6 कडवी अनिवार्य

नवी दिल्ली :
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणार्‍या ’वंदे मातरम्’ या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी या गीताची रचना केल्याला यंदा 150 वर्षे पूर्ण होत आहेत. या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालयाने 6 फेब्रुवारी रोजी एक नवीन आदेश जारी केला आहे. यानुसार आता सर्व अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये आणि विशेष प्रसंगी ’वंदे मातरम्’ची मूळ सहाही कडवी गाणे अनिवार्य करण्यात आले
आहे.
स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने गाण्याची ’धर्मनिरपेक्ष’ प्रतिमा जपण्यासाठी शेवटची चार कडवी वगळली होती. मात्र, गृहमंत्रालयाने आता मूळ रचनेतील सर्व सहा कडव्यांचा समावेश करून नवीन ’अधिकृत आवृत्ती’ तयार केली आहे. या संपूर्ण गीताच्या गायनाचा कालावधी 3 मिनिटे 10 सेकंद इतका निश्चित करण्यात आला असून, त्याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने ’वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, आता देशातील सर्व शाळांमध्ये सकाळच्या परिपाठात या गीताचे समूह गायन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवळ शाळाच नव्हे, तर ज्या ज्या सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये राष्ट्रध्वज फडकवला जातो, त्या सर्व ठिकाणी या गीताचे गायन करणे आता आवश्यक असेल. यामुळे विद्यार्थी आणि नागरिक स्तरावर राष्ट्रीय अस्मिता अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
अधिकृत राज्य कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती, राज्यपाल किंवा नायब राज्यपाल यांच्या आगमनावेळी आणि ते निरोप घेताना ’वंदे मातरम’ वाजवले जाईल. तसेच, आकाशवाणी आणि दूरदर्शनवर राष्ट्रपतींचे देशाला उद्देशून होणारे भाषण सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर हे गीत वाजवणे आता बंधनकारक असेल. मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार्‍या अनौपचारिक कार्यक्रमांतही या गीताचे सामूहिक सादरीकरण होऊ शकते.

उभे राहण्याचे नियम, चित्रपटगृहांना सवलत
राष्ट्रीय गीत वाजवले जात असताना उपस्थितांनी ’सावधान’ स्थितीत उभे राहून आदर व्यक्त करणे आवश्यक आहे. तथापि, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट किंवा न्यूज रीलचा भाग म्हणून हे गीत आल्यास प्रेक्षकांना उभे राहणे अनिवार्य नसेल. चित्रपट पाहताना उभे राहिल्याने शांततेचा भंग होऊ शकतो आणि इतरांच्या दर्शनात अडथळा येऊ शकतो, हा विचार करून ही विशेष सवलत देण्यात आली आहे.

Historic decision of the Center, all 6 Kadvi mandatory

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *