आमदार देवयानी फरांदे यांची कठोर कारवाईची मागणी
नाशिक ः प्रतिनिधी
नाशिक शहरातील शासकीय जमिनींवर वाढत्या अतिक्रमणाच्या प्रकारांबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी जिल्हाधिकारी नाशिक व पोलीस आयुक्त नाशिक यांना सविस्तर निवेदन देत तातडीने चौकशी व फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाशिक तहसील अंतर्गत नाशिक-3 विभागातील सर्व्हे नं. 1042/2 व सर्व्हे नं. 1056 या दोन्ही जमिनींवर भूमाफियांनी बेकायदेशीर ताबा घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
आमदार फरांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व्हे नं. 1042/2 ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असून, मालकी सदरीमध्ये सरकार अशी स्पष्ट नोंद आहे. असे असताना काही व्यक्तींनी सदर जागेवर अनधिकृत ताबा घेतला असून, वॉल कंपाउंडचे बांधकाम केले आहे. इतकेच नव्हे तर संबंधितांनी स्वतःचे नाव जागामालक म्हणून फलकावर दर्शविले असल्याची बाब उघडकीस आली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, शासकीय मालमत्तेवर खुलेआम अतिक्रमण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
सध्या नाशिक अपर तहसील कार्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्यामुळे कार्यालयीन कामकाजात अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्व्हे नं. 1042/2 ही शासकीय जमीन अपर तहसील कार्यालयासाठी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणीही आमदार फरांदे यांनी केली आहे. प्रशासनाच्या दृष्टीने ही जागा अत्यंत उपयुक्त असून, नागरिकांच्या सोयीसाठी येथे कार्यालय उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी
स्पष्ट केले.
याचप्रमाणे सर्व्हे नं. 1056 या शासकीय जमिनीवरही भूमाफियांनी बेकायदेशीररीत्या ताबा घेत बांधकाम केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संबंधितांनी महावितरण कंपनीच्या काही अधिकार्यांशी संगनमत करून या ठिकाणी विद्युत मीटर मंजूर करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून वीजजोडणी मिळविणे हा कायद्याचा उघड उघड भंग असून, यातून शासनाचे आर्थिक व कायदेशीर नुकसान होत असल्याचे आमदार फरांदे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित भूमाफियांवर तसेच त्यांना मदत करणार्या व संगनमत करणार्या अधिकार्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, शासकीय जमिनीवरील बेकायदेशीर ताबा तात्काळ हटविण्यात यावा व जमीन मूळ शासकीय ताब्यात देण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.
Land mafias take control of government lands