70 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत उपचारांचे संरक्षण
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सत्तर वर्षे व त्यापुढील वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत उपचारांचे कवच उपलब्ध करून देणारी ‘वय वंदना कार्ड’ निर्मितीची विशेष मोहीम येत्या 20 फेब्रुवारीपासून 13 मार्च 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ही मोहीम आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये राबवली जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे.
या मोहिमेंंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सुमारे 3,08,958 ज्येष्ठ नागरिकांचे ई-केवायसी पूर्ण करून त्यांना ‘वय वंदना कार्ड’ वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कार्डाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची सुविधा मिळणार आहे.
जिल्ह्यातील शिल्लक लाभार्थ्यांच्या याद्या क्षेत्रीय कर्मचार्यांना देण्यात आल्या असून, प्रत्येक कर्मचार्याला दररोज किमान 25 ई-केवायसी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. ज्या गावांमध्ये 70 वर्षांवरील सर्व नागरिकांचे 100 टक्के कार्ड वाटप पूर्ण होईल, त्या गावांचा तसेच उत्कृष्ट काम करणार्या कर्मचार्यांचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, तसेच घरातील 70 वर्षांवरील आजी-आजोबांचे ‘वय वंदना कार्ड’ प्राधान्याने काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.
कार्ड कसे काढावे?
ज्येष्ठ नागरिकांनी beneficiary.nha.gov.in या पोर्टलवर किंवा आयुष्मान ॲप माध्यमातून स्वतः कार्ड काढू शकतात. गावपातळीवरील आशासेविका, रेशन दुकानदार आणि आपले सरकार सेवा केंद्र यांच्या मदतीनेही कार्ड तयार करता येणार आहे. कार्डसाठी आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न मोबाइल क्रमांक (ओटीपीसाठी) एवढीच कागदपत्रे आवश्यक आहेत. संपूर्ण प्रक्रिया केवळ पाच मिनिटांत पूर्ण होते.