पवननगरला फ्लॅटचे कुलूप तोडून 37 हजारांची चोरी

सिडको : विशेष प्रतिनिधी येथील पवननगर परिसरात रोड फ्रंट गाळा व फ्लॅटचे कुलूप तोडून 37 हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. 25 फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाणे येथे राजाराम मालाजी बोरसे (रा. पवननगर, सिडको) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी योगेश मधुकर कोठावदे (वय 42, रा. पिंपरी-चिंचवड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सिडको परिसरातील त्यांचा रोड फ्रंट फ्लॅट व शटर असलेला गाळा मागील वर्षभरापासून बंद होता. मालमत्तेबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने ते पुणे येथे वास्तव्यास होते. या काळात संशयिताने गाळ्याचे शटर तसेच फ्लॅटच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचा आरोप आहे. गाळ्यातील लाकडी दरवाजा, बॅनर, लोखंडी टेबल, काउंटर, सीसीटीव्ही कॅमेरे, रॅक आदी साहित्य असा एकूण 37 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल टेम्पोच्या सहाय्याने चोरून नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, संशयिताचे ‘कांचन स्वीट्स’ नावाचे दुकान चोरी झालेल्या गाळ्याच्या शेजारीच असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित मिळकत सन 2019 मध्ये 65 लाख रुपयांना संशयिताकडून फिर्यादी यांच्या वडिलांच्या नावे खरेदी करण्यात आल्याचे समजते. विक्रीस प्रथम प्राधान्य देण्याच्या करारानंतरही आर्थिक व्यवहार जुळून न आल्याने वाद न्यायालयात गेला होता. या वादातूनच चोरीचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Rs 37,000 stolen by breaking the lock of a flat in Pawannagar

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *