आपल्या अवतीभवतीचे जग विज्ञानमय झाल्यासारखे वाटतेय ना! नवनवीन शोधांनी परिसीमा गाठली आहे. आता काही बघायचं बाकी राहिले नाही बाई, असे म्हणतं विज्ञानातील नवनवीन शोधांनी थक्क व्हायला होत आहे. लवकरच हवेत उडणार्या कारही बघायला मिळतील. विज्ञान प्रत्येक गोष्टीकडे घटनेकडे डोळसपणे बघण्याची दिशा देते. घटनेमागील कारण शोधने, चिकिस्ता करणे, जिज्ञासू वृत्ती हे वैज्ञानिक दृष्टिकोनच आहे.
पूर्वी शिक्षणाचा अभाव अज्ञान, अंधश्रद्धेवरील अंधविश्वास यामुळे अनेकदा चुकीच्या प्रथांना बळी पडून नुकसान व्हायचे. आता बदलते विचार, शिक्षणाची जोड, बदलते जीवनमान यामुळे वैचारिक बदल ही घडताना दिसत आहेत. विज्ञानामुळे जग जवळ आल्यासारखे भासत आहे. विज्ञानाने मानवी जीवनात मोठी क्रांती घडवली आहे. हाताच्या बोटांच्या तालावर अनेक गोष्टी घडविणे हलविणे विज्ञानानै शक्य करुन दाखवले आहे.
भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होतो. विज्ञानाचा प्रसार करणे व जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, हे या दिवसाचे महत्त्वाचे हेतू आहेत. अनेक थोर भारतीय वैज्ञानिकांनी अनेक चमत्कार वास्तवात आणून दाखविले. आपल्या मनातील अनेक शंका-कुशंकांना योग्य उत्तर आणि दिशा मिळवून दिली. थोर भारतीय भौतिकशास्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामण यांनी. रामण इफेक्ट हा महत्त्वपूर्ण शोध लावला तो 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी. त्यासाठी त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिकही मिळाले. विज्ञानाचे महत्त्व रुजविणे, तरुणांना संशोधनासाठी प्रोत्साहन देणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे, हे या दिवसाचे महत्त्व आहे.
शिक्षणात, दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व वाढले आहे. आपल्या अवतीभवती असणारा परिसर व त्यातील विज्ञान यांची ओळख अगदी लहानवर्गापासून मुलांना करून दिला जातोय. विचारप्रवर्तक विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही विज्ञाना बद्दल अनास्था वाटणे, त्यातील संकल्पना निटपणे न समजणे, म्हणून त्यापासून दूर पळणे, वैज्ञानिक संकल्पना बोजड वाटणे, अशा विचारांमुळे विज्ञानापासून दूर पळणारे विद्यार्थी दिसतात. खरेतर आपले दैनंदिन जीवनच मुळी विज्ञानावर अवलंबून आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यत आपण विज्ञानावर अवलंबून आहोत. विज्ञानाशिवाय प्रगती शक्य नाही. विज्ञानच मानवी जीवनाला नवी कलाटणी देत असते. विज्ञानामुळे मानवी जीवन सुकर झाले आहे. अनेक अशक्य गोष्टी विज्ञानाने शक्य करून दाखविल्या आहेत.
विज्ञान आपल्याला पुराव्यांवर आधारित विचार करणे शिकवते. विज्ञानामुळे संपूर्ण जग हातात नव्हे, तर हाताच्या बोटांवर आल्यासारखे भासत आहे. असे असले तरी, अंधश्रद्धेला बळी पडणारे जेव्हा दिसतात, तेव्हा वाईट वाटते. विज्ञान दिनानिमित्ताने तार्किक विचार करण्याची सवय रुजवूया. मिथकांवर किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता, प्रश्न विचारूया, निरीक्षण करण्याची सवय वाढवूया. तार्किक विचार करत तथ्यांचा आदर करण्याची आणि मानवाच्या कल्याणासाठी विज्ञानाचा डोळसपणे वापर करण्याची प्रतिज्ञा करूयात.
Application of science