स्थायी सदस्य भारती ताजनपुरेंची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेने यापुढे दहा लाखांच्या आतील कामे बेरोजगार अभियंता, तसेच स्थानिक मजूर सहकारी बांधकाम संस्थांना देताना ती ऑफलाइन निविदा प्रक्रियेने देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका भारती ताजनपुरे यांनी केली. स्थायी सभेने याबाबतचा ठराव करण्याचीही मागणी केली.
स्थायी समितीची सभा मंगळवारी (दि. 17) सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ताजनपुरे यांनी ही मागणी केली.
त्या म्हणाल्या, की स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना स्थानिक लोकांच्या दैनंदिन समस्या तातडीने सोडवणे, हे एकमेव ध्येय आहे. तत्परतेने जनसुविधेची कामे करण्याचे धोरण आखले आहे. मात्र, काही ठिकाणी निधीची उपलब्धता असतानाही प्रशासकीय कारणास्तव विकासकामांना निविदा प्रक्रियेमुळे विलंबाला सामोरे जावे लागते. यामुळे नागरी समस्या सोडविण्यात अपयशी ठरत असल्याचे जाणवते.
नागरी समस्यांचे गांभीर्य लक्षात घेता राज्यातील इतर महापालिकांनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य शासनानेही दहा लाखांच्या आतील अंदाजपत्रक रक्कम असलेली कामे बेरोजगार अभियंता, तसेच स्थानिक मजूर सहकारी बांधकाम संस्थांना ऑफलाइन निविदा प्रक्रियेमार्फत देतात. तरी नाशिक महापालिकेनेही याप्रकरणी ठराव मंजूर करण्याची मागणी ताजनपुरे यांनी केली. त्यांना इतर सदस्यांनीदेखील साथ दिली.
Works under Rs 10 lakhs should be awarded through offline tender process.