सोने सात हजारांनी उतरले; चांदीचीही तेजी थांबली
नाशिक ः प्रतिनिधी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला सोने खरेदी केली जाते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर डॉलर मजबूत झाल्याने इतर देशांनी डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, सोने-चांदी दरात घसरण झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. दर कमी झाल्याने ग्राहकांनी मुहूर्तावर सोने घेण्यास गर्दी केली होती.
सोने दर जवळपास 7 हजारांनी घसरले आहेत. परिणामी, ग्राहकांनी लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी सोने खरेदीस प्राधान्य दिले आहे. प्रति दहा ग्रॅम सोने दर एक लाख 50 हजार इतका नोंदविण्यात आला आहे. चांदी दर 2 लाख 30 हजार प्रतिकिलो नोंदविण्यात आला आहे.त्यामुळे गेल्या काही आठवड्यांत सोने दराने पावणेदोन लाखांचा टप्पा ओलांडला होता.दोन लाखांपुढे सोनेदर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच चांदीनेही तीन लाखांचा टप्पा जवळपास गाठलाच होता.परंतु, त्यानंतर चांदीत जोरदार घसरण झाली होती. अडीच लाखांवर चांदीचे दर स्थिरावले होते. परंतु, युद्धजन्य परिस्थितीत सोने दर हे वाढत असतात. परंतु, युद्धाच्या झळांंमुळे इतर देशांनी आपल्या देशातील सोने -चांदी विकण्यास सुरुवात केली असल्याने दरात घसरण झाल्याचे बोलले जात आहे.डॉलर्सचे भाव वाढल्याने इतर देशांनी डॉलर्स खरेदीकडे लक्ष केंद्रित केल्यानेही सोने-चांदी दरात घसरण झाली आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाइटवेट ज्वेलरी, चोख सोने, लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी खरेदीस प्राधान्य दिल्याचे चित्र सराफ बाजारात होते.
चांदीच्या देवाच्या मूर्ती, पूजेचे साहित्य तसेच जोडवी, पायल, लहान मुलांचे दागिने आणि चोख बिस्किट स्वरूपात चांदीच्या खरेदीस ग्राहकांनी पसंती दिली होती.
लाइटवेट ज्वेलरीमध्ये मंगळसूत्र 3 ग्रॅमपासून ते तीस तोळ्यापर्यंत. चोख सोने वेढी, बिस्किट, बांगड्यांच्या स्वरूपात मागणी दिसून आली. कानातले, वेल, अंगठी, गळ्यातील हार, राणीहार, पोहेहार, पाच ग्रॅममधील नाजूक नेकलेस, वेस्टर्न आणि पारंपरिक कानातल्यांचे असंख्य प्रकार तसेच ठुशी, मोहनमाळ यांनाही मागणी असल्याने सराफ बाजाराला गुढीपाडव्याच्या मुहुूर्तावर बुस्ट मिळाला आहे. मोठी आर्थिक उलाढाल यानिमित्ताने झाली आहे.
दरात घसरण झाल्याचा फायदा ग्राहकांनी घेत मुहूर्तावर सोने खरेदी केली. सध्या दरात चढ-उतार होत असून, ग्राहकांनी लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले आहे.
– गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन
युद्धाच्या पार्श्वभूमीवर डॉलर मजबूत झाल्याने इतर देशांनी डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, सोने-चांदी दरात घसरण झाली असून, ग्राहकांना याचा फायदा होत आहे. सध्या लग्नसराईसाठी लाइटवेट दागिन्यांना मागणी आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी गर्दी केली आहे.
– मयूर शहाणे, संचालक, मयूर अलंकार
असे आहेत सोने दर
24 कॅरेट : प्रति दहा ग्रॅम 1 लाख 50 हजार
22 कॅरेट : प्रति दहा ग्रॅम 1 लाख 37 हजार
चांदी : 2 लाख 41 हजार प्रतिकिलो जीएसटीसह
fall-in-gold-prices-boosts-buying-enthusiasm