मनपाला नव्या मालमत्तांचा आधार

25 हजार मालमत्ता कराच्या कक्षेत; 22 कोटींचा महसूल

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेचा कर विभाग थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. कर विभागाला 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 308 कोटींचे उद्दिष्ट दिले असून, त्यापैकी आतापर्यंत 280 कोटींच्या आसपास वसुली होत आली आहे. दरम्यान, कर विभागाने शहरातील ज्या मालमत्तांची नोंद पालिकेच्या दप्तरी नाही, अशा मालमत्तांचा शोध गेल्या वर्षापासून सुरू केला आहे. त्यानुसार आतापर्यंत 25 हजार 618 नवीन मालमत्ता सर्वेक्षणातून समोर आल्या आहेत. त्यांच्याकडून महापालिकेला तब्बल 22 कोटी 12 लाखांचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेला हातभार लाभला आहे.
पालिकेची मिळकतदारांकडे अद्याप सातशे कोटींची थकबाकी पडून आहे. संबंधितांविरोधात प्रशासनाने जप्तीचे वॉरंट धाडले जात आहे. दरम्यान, कराच्या कक्षात नसलेल्या मालमत्ता शोधमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत नवीन मूल्यांकन झालेल्या मालमत्ता, मोकळे भूखंड, बांधकाम विस्तार (एक्स्टेन्शन), भाडेकरू नोंदणी, तसेच वापर बदललेल्या (चेंज ऑफ यूज) मालमत्ता आदींचा तपास केला जातो. या प्रक्रियेमुळे महापालिकेच्या करात वाढ झाली आहे. तसेच पालिकेत मालमत्तांची नोंद यापुढे कायमची वाढली आहे. पूर्वी कर न भरलेल्या किंवा नोंद नसलेल्या मालमत्तांना आता करात आणले आहे. महापालिकेत प्रशासकीय राजवटीच्या काळात आयुक्त मनीषा खत्री यांनी मनपाच्या दप्तरी नोंद नसलेल्या मालमत्तांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कर विभागाने सहाही विभागांत सर्वेक्षण करत मिळकतदारांचा शोध घेतला आहे.

आतापर्यंत नवीन मालमत्ता शोधून त्या कराच्या कक्षेत आणून त्याद्वारे पालिकेला 22 कोटींचा महसूल मिळाला आहे. तसेच थकबाकी असलेल्या मिळकतदारांनीदेखील त्यांच्याकडील रक्कम भरून पालिकेला सहकार्य करावे.
– अजित निकत, उपायुक्त, कर विभाग, मनपा

विभागनिहाय नव्या
मालमत्तांची संख्या
पंचवटी              –  8962
नवीन नाशिक   –  5205
सातपूर              – 4502
नाशिक पूर्व       –  3348
नाशिकरोड        – 2770
ना. पश्चिम       – 831

Municipal Corporation gets support from new properties

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *