मालेगाव तालुक्यात ‘अवकाळी’चा तडाखा

पिकांचे मोठे नुकसान; गारपिटीमुळे शेतकरी हतबल

मालेगाव : प्रतिनिधी
हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचा आनंद साजरा करत असतानाच, गुढीपाडव्याच्या दिवशी गुरुवारी (दि.19) सायंकाळी मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकर्‍यांच्या आनंदावर अक्षरशः पाणी फेरले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू झालेल्या या पावसासोबत गारपीट झाली. जवळपास अर्धा तास ते एक तास चाललेल्या या अवकाळी पावसाने वडनेर, खाकुर्डी, सावतावाडी, कोठरे, अजंग, वडेल, रावळगाव, दुंधे व परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला असून, डाळिंब, कांदा, गहू, भाजीपाला यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः डाळिंबबागांमध्ये सध्या फुलोरा सुरू असताना गारांच्या तडाख्यामुळे फुले गळून पडली. त्यामुळे आगामी उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. अनेक बागायतदारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कांदा पिकांनाही या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. गारांच्या मार्‍यामुळे कांद्याची पिकांवर परिणाम होणार आहे. तसेच काढणीसाठी तयार असलेला गहूही ओलाव्यामुळे खराब होण्याची शक्यता वाढली आहे. भाजीपाला पिकांवरही याचा विपरीत परिणाम झाला असून बाजारात जाणारा माल मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.
दुंधे माळीनगर परिसरात, तर गारांचा अक्षरशः थर साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. या भागात गारपीट इतकी तीव्र होती की काही ठिकाणी जमिनीवर पांढरा गारांचा गालिचा पसरल्यासारखा दिसत होता. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सकाळी गुढी उभारून नव्या हंगामाच्या आशा बाळगणार्‍या शेतकर्‍यांना संध्याकाळी आलेल्या या संकटाने मोठा धक्का दिला. “सकाळी आनंदात सण साजरा केला, पण संध्याकाळी गारपिटीने सर्व काही उद्ध्वस्त केले,” अशी व्यथा दुंधे येथील शेतकर्‍याने व्यक्त केली. सावतावाडी परिसरातील शेतकर्‍यांनीही “आधीच महागाई आणि उत्पादन खर्च वाढला असताना आता झालेल्या नुकसानीमुळे पुढील वाटचाल कशी करावी, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे,” अशी भावना व्यक्त केली.वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड झाली असून, शेतमालाचेही नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्‍यांनी नुकतेच खत, औषधे व मजुरीवर मोठा खर्च केला होता. मात्र या अवकाळी पावसामुळे त्यांच्या गुंतवणुकीवर पाणी फिरले आहे. त्यामुळे आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. दरम्यान, या नुकसानीची दखल घेऊन प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. कृषी विभागानेही त्वरित पाहणी करून अहवाल सादर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रब्बी हंगामातील पिके काढणीच्या टप्प्यावर असतानाच आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णतः खचला असून त्यातून सावरणे कठीण असल्याचे चित्र आहे.

“आधीच सुलतानी संकटांचा सामना करत असताना आता अस्मानी संकटाने कंबर मोडली आहे. या परिस्थितीत शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा.
-मुन्ना रौंदळ, युवा शेतकरी, माळीनगर, दुंधे

 

‘Unseasonal rain’ hits Malegaon taluka

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *