वादळी पाऊस अन् गारपिटीमुळे लासलगाव, शिरवाडे, कानळदला नुकसान
निफाड तालुका : प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील लासलगाव, ब्राह्मणगाव (विंचूर), कोटमगाव, टाकळी(विंचूर)सह पूर्व भागातील शिरवाडे, वाकद, कोळगाव, कानळद, द्राक्षपंढरी समजल्या जाणार्या उगाव, वनसगाव परिसरात गुरुवारी (दि. 19) दुपारी सव्वाचारच्या सुमारास जोरदार वार्यासह गारा बरसू लागल्याने शेतकर्यांची एकच तारांबळ उडाली. हवामानाच्या अनपेक्षित बदलामुळे शेतकर्यांच्या गहू, द्राक्ष व कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गुरुवारी दुपारपर्यंत वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्मा असतानाच अचानक ढग दाटून आले आणि काही क्षणांतच वादळी वार्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. यासोबत झालेल्या गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकांवर मोठा परिणाम झाला. विशेषतः द्राक्षबागांमधील घडांना फटका बसला. द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. या नुकसानीचे वास्तव शुक्रवारी समोर येण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या वादळी वार्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले असून, उन्हाळी कांद्याच्या पिकाचेही नुकसान झाले आहे. मराठी नववर्षाच्या सुरुवातीलाच अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेकांनी हे संकट 2009 मध्ये आलेल्या गारपिटीच्या आपत्तीशी तुलना केली आहे. त्यावेळीही या भागाला शंभर टक्के फटका बसला होता. आधीच उत्पादन खर्चात वाढ झालेली असतानाच, अनिश्चित बाजारभाव आणि हवामानातील लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या नव्या संकटाने त्यांची चिंता अधिक वाढवली आहे. अनेक शेतकर्यांचे उत्पन्न धोक्यात आले आहे. म्हणूनच शासनाने याची दखल घेऊन नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करावा, शेतकर्यांना आर्थिक मदत जाहीर करावी तसेच पीकविमा योजनेंतर्गत नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात अशी परिस्थिती असतानाच द्राक्षपंढरी समजल्या जाणार्या उगाव, शिवडी, खेडे, वनसगाव भागात देखील सायंकाळी पाचच्या सुमारास अर्धा-पाऊण तास पाऊस झाला. विजांचा कडकडाटासह झालेल्या या पावसात पाच ते सात मिनिटे लहान-मोठ्या आकाराच्या गारा पडल्याने द्राक्षमालाचे नुकसान झाले. अखेरच्या टप्प्यात द्राक्षबागायतदारांवर निसर्ग कोपला आहे. द्राक्षासह शेतातील कांदा, गहू, हरभरा या काढणीस आलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. शेतात कापणी करून ठेवलेला गहू, हरभरा भिजला आहे. अचानक नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदाही दोन महिने अगोदरच पावसाने वादळी वार्यासह हजेरी लावल्याने शेतकर्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे. हातात आलेली पिके वाया गेल्याने आता शासनाच्या मदतीची शेतकर्यांना अपेक्षा आहे.
Baliraja ‘disadvantaged’ due to unseasonal rains