गॅस सिलिंडर तुटवड्याचा भाविक पर्यटनावर परिणाम

त्र्यंबकमधील हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धाने गॅस सिलिंडरचा तुडवडा निर्माण झाला आहे. या युद्धाची झळ त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनाला बसण्यास प्रारंभ झाला आहे. येथे दर्शनासाठी आणि नारायण नागबली पूजाविधी करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यांना जेवण, नाश्ता सुविधा पुरवणार्‍या घरगुती खानावळ व्यावसायिकांना गॅस सिलिंडरअभावी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
रस्त्यावर चहा, वडापाव विक्री करणारे व्यावासयिक सिलिंडर मिळत नाही आणि घरगुती सिलिंडरचा वापर केला तर शासन अधिकारी पकडतात. या दुहेरी कात्रीत सापडल्याने त्यांनीदेखील हातगाडे बंद ठेवले आहेत. काही हॉटेलचालकांनी खाद्यपदार्थांचे दर वाढवले आहेत. तेदेखील येत्या चार-पाच दिवसांत परिस्थिती बदलली नाही तर बंद होण्याच्या मार्गावर आहेत. घरातील स्वयंपाकासाठी इंधन मिळणे अवघड झाले आहे. आधुनिक जीवनशैली, बदलते राहणीमान यामुळे पूर्वी घरोघरी असणार्‍या चुली तसेच शेगडी आणि कोळसा आता कालबाह्य झाल्या आहेत व त्यांचा वापर करणेदेखील शक्य
राहिलेले नाही.
स्टोव्हसाठी रॉकेल मिळत नाही. तथापि काही जुगाड करणारे डिझेलचा वापर करत आहेत, मात्र तो धोकेदायक आहे. विजेवर चालणारी शेगडी, इंडक्शन प्लेट यांचा वापर होत आहे. बाजारात त्यांची मागणी वाढली आहे. मात्र, वीजबिल परवडणारे नाही. तसेच सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ शिजवण्यास विजेची शेगडी अथवा इंडक्शन प्लेटने आवश्यक उष्णता
मिळत नाही.

पंधरा दिवस उपाशी राहणार का?

ग्रामीण भागासाठी 45 दिवसांचे बुकिंग सुरू झाले आहे. वास्तविक पाहता, चार व्यक्तींच्या कुटुंबाला एका महिन्याला एक गॅस सिलिंडर गरजेचे ठरते. मात्र, शासन यंत्रणा 45 दिवसांचा अवधी देत असल्याने 15 दिवस उपाशी राहणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. ऑनलाइन अथवा फोनवर बुकिंग घेतले जात नाही. घरपोच सेवा बंद झाली आहे. ग्रामीण भागातून आणि शहरातून नागरिक रिकामे गॅस सिलिंडर घेऊन वितरकाकडे जातात, मात्र दिवसभर थांबून गाडी आली नाही म्हणून सिलिंडर घेऊन पुन्हा गावाकडे जाण्याची वेळ येत आहे. शासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.

Gas cylinder shortage affects pilgrim tourism

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *