नैताळेत महामार्गावर रास्ता रोकोचा इशारा अन् प्रशासनाची धावपळ
निफाड : विशेष प्रतिनिधी
पालखेड डाव्या कालव्याच्या चारी नंबर 17 जवळ नैताळे शिवारात कालव्याच्या कडेला कपडे धुण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणीचा पाय घसरून कालव्याच्या प्रवाहात पडल्याची घटना शनिवारी (दि. 21) दुपारी साडेचारच्या दरम्यान घडली. तरुणीचा मृतदेह कालव्यात शोध घेऊनही सापडत नसल्याने सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरगुडे यांच्या नेतृत्वाखाली तरुणीचे नातेवाईक व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच पोलीस, महसूल व पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांनी धावपळ होऊन त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाला पाचारण करून शोधमोहीम सुरू केली. शोध सुरू असताना त्या तरुणीचा मृतदेह कालव्यात डोंगरगाव परिसरात सापडल्याने सर्व अधिकार्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
पालखेड डाव्या कालव्याच्या चारी नंबर 17 जवळ नैताळे शिवारात ज्योती अनिल शेकरे (वय 18, मूळ रा. ओबीधोंड, ता. पेठ, सध्या कामानिमित्त नैताळेे) ही तरुणी कपडे धुण्यासाठी कालव्यावर गेली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा पाय घसरल्याने ती थेट कालव्यात पाण्यात पडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व कुटुंबाने मदतीसाठी धाव घेतली. पाण्यात पोहणार्या अनेक तरुणांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा मृतदेह मिळून आला नाही. या घटनेची माहिती मिळताच तातडीने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन शोधमोहिमेचे नियोजन केले होते. निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. तसेच कालव्याच्या पात्रात तरुणीचा शोध घेण्यासाठी विशेष रेस्क्यू पथक तैनात केले होते. स्थानिक तरुण तसेच आपत्ती व्यावस्थापनाचे सागर गडाख व टीम यांना पालखेड डाव्या कालव्यात पुन्हा शोध मोहीम सुरु केली शोध सुरू असतानाच त्या तरुणीचा मृतदेह कालव्यात डोंगरगाव शिवारात सापडला आणि सर्व विभागाच्या अधिकार्यांनी अक्षरशः सुटकेचा निश्वास टाकला.
या शोधमोहिमेत अधिकार्यांसह पोलीस ठाण्याचे नितीन सांगळे, राजेंद्र दरोडे, विनोद जाधव, सागर घोलप, योगेश आव्हाड, कपालेश्वर ढिकले, महसूलचे मंडळ अधिकारी संतोष डुंबरे, नैताळेचे तलाठी शंकर खडांगळे, पाटबंधारे विभागाचे विंचूर 5 अचे अधिकारी वैभव कळमकर, नैताळे शाखा अधिकारी हर्षल बागूल, समाधान आढांगळे सहभागी झाले होते.
The body of the drowned girl was finally found.