म्हसरूळ व आडगाव परिसरात दोघांचा अपघातात मृत्यू

पंचवटी : प्रतिनिधी
शहरातील म्हसरूळ आणि आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन भीषण अपघातांमध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका घटनेत भरधाव दुचाकीने धडक दिल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. दुसर्‍या घटनेत कुत्रे आडवे आल्याने कार पलटी होऊन एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी रोडवरील म्हसरूळ पोलीस चौकीसमोर एका भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत साहेबराव राजाराम ढिकले या वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचा मुलगा योगेश साहेबराव ढिकले (रा. चाचडगाव, दिंडोरी) यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक 20 मार्च रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास साहेबराव ढिकले आणि कचरू बोंबले हे दोघे मोटारसायकलवरून आडगाव लिंक रोडकडून म्हसरूळकडे येत होते. यावेळी म्हसरूळ गावाच्या चौकात राज स्वीटकडून येणार्‍या दुचाकीस्वाराने (एमएच 20-जीवाय 1537) आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवून ढिकले यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात साहेबराव यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी गणेश पुंजाराम जगताप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक मंदृपकर अधिक तपास करत आहेत.
दुसर्‍या घटनेत सायखेडा रोडवरून नाशिककडे येत असताना अचानक कुत्रे आडवे आल्याने कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात डिगंबर कैलास बोडके (41, रा. स्वामी समर्थनगर) यांचा मृत्यू झाला. 15 मार्च रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास डिगंबर बोडके हे त्यांच्या स्विफ्ट कारने (एमएच43-एएफ5048)सायखेडाकडून नाशिककडे येत होते. दत्त स्वामी मोटर्ससमोर कुत्रे आडवे आल्याने गाडीचा वेग जास्त असल्याने ती पलटी झाली. या अपघातात डिगंबर यांच्या मेंदूला आणि छातीला गंभीर मार लागला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना 22 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचे भाऊ राजेश कैलास बोडके यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार देसाई या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Two killed in accident in Mhasrul and Adgaon areas

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *