केवळ खरातच दोषी आहे का?

नाशिकमधल्या भोंदू अशोक खरातला अटक झाली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. आता एका भोंदूबाबाचा आणि राजकारणाचा तसा अर्थाअर्थी काही संबंध येऊ शकत नाही. मात्र, खरातचा आला. त्याचे कारण देशाच्या केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याच्या अनेक मंत्र्यांचा त्याच्याकडे असलेला राबता. हे फोटो एखाद्या कार्यक्रमातले नाहीत. कोणी सहज बाजूला उभे राहून काढलेले नाहीत. ते निवांत क्षणी काढलेले आहेत. स्वतःला समाजसेवक आणि प्रचंड पैसे ओतून पदावर बसलेल्या लोकांना एखाद्या भोंदूसाठी इतका वेळ मिळतो. एका महिलेने तक्रार करण्याचे धाडस केल्याचे वरकरणी कारण आणि कोणत्या तरी आर्थिक फसवणुकीतून त्याला अटक झाली नसती, तर हे सत्ताधारी त्याच्या दरबारात आपली सेवा देत राहिले असते. यांना आपण राज्याचे आणि देशाचे नेते म्हणायचे यापेक्षा दुर्दैव ते काय?

या सार्‍या प्रकारात काही माध्यमांनी अशोक खरात हा लिंगपिसाट, बलात्कारी असे रंगवण्याचा प्रयत्न केला. आपल्या तथाकथित नेत्यांची चर्चा होऊ नये म्हणून चर्चा दुसरीकडे फिरवण्याचा प्रयत्नही काही लोकांनी केला. वास्तविक हे सारेच या प्रकारात दोषी आहेत. खरातची चौकशी होईल की त्याचा फार्स होईल अशी शंकाही अनेक जण व्यक्त करत आहेत. खरातसारख्या लोकांची यांना गरज का लागते? तो असे काय करत होता जेणेकरून त्याला हे लोक इतका मान देत होते? या सार्‍या तथाकथित नेत्यांवर त्याने अशी काय जादू केली होती की, त्यांनी बलात्कारीच्या डोक्यावर छत्री धरायचीे? या प्रकरणाची कारणे फार खोल आहेत. गेल्या काही वर्षांत या देशात कधी नव्हे ते विज्ञानवादी विचारसरणीपेक्षा अंधश्रद्धाळू विचारसरणीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. ते धार्मिक नाही, केवळ धर्माचा आणि आयोगाचा वापर करून मिळविलेली सत्ता आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा वापरण्यात येत आहे. सत्ताधार्‍यांकडूनच गुंडगिरी आणि धर्माचा अतिरिक्त वापर करण्यात येत आहे. त्याचे परिणाम समाजात होणारच. त्याचा गैरफायदा हे भोंदू घेत असतात. खरातच्या प्रकरणानंतर अशा प्रकारची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. मी महादेवाचा अवतार आहे, असे म्हणणारा एक किडाही नुकताच पकडण्यात आला आहे. समाजात जेव्हा विज्ञानाधिष्ठित विचारसरणीपेक्षा अशा प्रकारची विचारसरणी पोसली जाते, तेव्हा त्याचा फायदा हे लोक घेतात. त्यात ज्येष्ठ लोकांपेक्षा तरुणांचा भरणा अधिक असतो. या देशातील ज्येष्ठांची एक पिढी ही चांगल्या राजकारणी आणि नेतृत्त्व पाहिलेली आहे. त्यामुळे त्यांचे प्रमाण कमी असले, तरी केवळ व्हॉट्सअ‍ॅपच्या ज्ञानावर स्वतःला मोठे समजणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे, हे कबूल करावे लागेल. गेल्या पिढीने देश घडवला होता. या तरुणाईनेही योग्य मार्गाला जाऊन देशाची जबाबदारी घ्यायला हवी.
या भोंदूबाबांच्या आहारी राजकारणी का लागताते? राजकारणी लोक अनेक साहस करून अनेक लोकांना बाजूला सारून त्या पदावर आलेले असतात. त्यांना त्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी काही दैवी गोष्टींची आवश्यकता भासत असते. अनेक कामांच्या कमिशन रूपाने मिळालेला पैसा राखून ठेवावा. त्याचा विनियोग करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे असते. त्यामुळे ते मनातून प्रचंड असुरक्षित असतात. सध्याच्या काळातले अनेक मंत्रीही या खरातकडे गेले, याचे कारण म्हणजे आपण काही लोकांच्या पाठिंब्यावर जिंकून आलेलो नाही, याची धास्तीही त्यांना खात असावी. त्यावर काही मानसिक आधार मिळविण्यासाठीही हे राजकारणी अशा ठिकाणी जात असतात. त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतात. त्यांचा सत्कार स्वीकारतात किंवा करतात. काही वैचारिक भूमिका असलेले राजकारणी या सार्‍या लोकांपासून दूर असतात. याआधी असे प्रकार तुलनेने कमी घडले. कारण ती राजकारणी मंडळी सुशिक्षित होती. तळागाळातून आलेली होती. समाजाविषयी त्यांना माहिती होती. समाजाला दिशा देण्याचे काम त्यांना करायचे होते. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन अशा प्रकारची मंडळी या भोंदूंच्या जवळ गेल्याचे काही उदाहरण नाही. त्यांनी समाजासाठी चांगले कार्य करणार्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याचे धोरण स्वीकारले होते. आता ते नाही. दुसरी एक गोष्ट खरातच्या प्रकरणातून जाणवते ती म्हणजे, आपल्या अतृप्त इच्छा सुखनैव पुर्‍या करण्यासाठी या राजकारणी लोकांना अशा बाबांचे आश्रम हे सुरक्षित वाटतात. त्यात त्यांचे पुरवठादारही असतात आणि त्यांची साखळी सुखनैव सुरू असते. याची माहिती पोलिसांना अजिबात नव्हती आणि त्यांना माहीत असल्याशिवाय हे इतकी वर्षे सुरू होते असे समजणे, हे फारच भाबडेपणाचे ठरेल. फार मोठे राजकारणी असल्यामुळे त्यांचेही हात बांधले जातात. त्याचप्रमाणे अशा प्रकरणात स्वतःहून काही कारवाई केल्यास ती बूमरँग होण्याचाही धोका असतो. हे भोंदू आपल्या पदरी राजकारणी, अधिकारी, अनेक विषयातले तज्ज्ञ पाळत असतात. त्यांच्या बाजूने बोलणारेही त्यांनी बनवलेले असतात. आपल्यावर काही बालंट आले तर अधिकारी आणि सत्ताधारी ते परस्पर उलटवतील आणि आपल्या पदरी असलेले लोक त्याची चर्चा दुसरीकडे घेऊन जातील, याचा विश्वास त्यांना असतो. तिथेच त्यांचे फावते.
खरात प्रकरण बाहेर आल्यानंतर एक मोठे राजकारण सुरू झाले आहे. चित्राताई वाघ यांनी ताबडतोब मुख्यमंत्र्यांचे कौतुक करून टाकले. कोणतेही पद रिकामे झाले तर ते देणार्‍याची स्तुती करणे स्वाभाविक असते. त्यानंतर एक समाजसेविका आपल्याबरोबर काही जणांना घेऊन या खरातच्या कोणत्या तरी आडवळणाच्या फार्महाउसवर गेल्या. तिथे त्यांनी आवाज उठवण्याचे नाटक करून आपणही या प्रकरणाच्या विरोधात आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. जर त्या खरोखर समाजसेविका असत्या तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या फळीच्या माध्यमातून त्यांना खरातचे कारनामे आधीच कळले असते. आता कारवाई सुरू केल्यानंतर आपण काहीतरी केल्याचे नाटक कशासाठी? स्वतःला खूप काही समजणारा खरातला मारून टाका म्हणून थेट कायद्याला भिडला. त्याला कोणी काही सुपारी दिल्याशिवाय तो बरळत नाही. जेव्हा जेव्हा एखाद्या प्रकरणाचा तपास किंवा कारवाई गंभीरपणे सुरू झालेली असते तेव्हा हा आरोपीला वाचवण्यासाठी किंवा सरकारची बाजू मांडण्याच्या नादात काही बरळत असतो. अर्थात, महाराष्ट्रातील विचारी जनता त्याला काही विचारत नाही म्हणून बरे आहे. एकाने या सार्‍या प्रकरणात संजय राऊत यांचे नाव घेऊन आपले विचारांचे दारिद्र्य दाखवून दिले. वास्तविक संजय राऊत यांची पत्रकारिता आणि त्यांचे विचार याची त्याला काहीच माहिती नाही. त्याला वाचताही येत नसावे. केवळ काहीतरी बरळून आपली पोळीभाजण्याचा त्याचा उद्योग असतो. हे असे प्रकार जी मंडळी करतात. तो त्यांचा बिनडोकपणा नसतो. त्याची ही बाष्कळ बडबडही एका योजनेचा भाग असतो. त्यामुळे तपासाची दिशा आणि त्याचे गांभीर्य कमी होते. या लोकांचे जे समर्थक असतात त्यांना त्यांचे पटते.
खरातने केवळ काही महिलांचे शोषणच केले नाही. त्याने महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावली आहे. ज्या महाराष्ट्रात फुले, आंबेडकर यांचे विचार आहेत. जिथे वारकरी संप्रदाय, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, ज्ञानेश्वर, तुकारामासारखे संत होऊन गेले. अनेक विचारवंतांची जी भूमी आहे. त्या मातीत जन्माला आलेली ही घाण आहे. वाईट या गोष्टीचे वाटते की, सत्ताधार्‍यांपैकी अनेक जण ही घाण अंगाला फासून साळसुदपणाचा आव आणत आपल्या अवतीभवती वावरत होते. या प्रकरणाचा तपास कसा आणि किती होईल, हे येणारा काळ जरी सांगणारा असला, तरी समाजाने आणि त्यातही तरुणाईने या सार्‍या गोष्टींचा अगदी बारकाईने विचार करावा, ही अपेक्षा आहे.

Is only Kharat guilty?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *