बर्याच वर्षांपूर्वी आमच्या फॅक्टरीतली आठवण आहे. आमच्या मॅनेजमेंटने एक अॅार्डर काढली की, येणार्या एक एप्रिलपासून सर्वांना (स्टाफ व कामगार) त्यांचे वेतन रोखमध्ये मिळणार नाही, तर त्यांच्या बँकेत जमा केले जाईल. स्टाफ आणि कामगारांनी तीव्र विरोध केला, पण मॅनेजमेंट काही डगमगली नाही. शेवटी तडजोडीने व्यवस्था केली गेली ता की, कामगारांना रोख पैसे मोजण्याचा आनंद मिळत राहावा. तर सांगायचा मुद्दा असा की, पगाराच्या रोख नोटा घेताना एक अवर्णनीय आनंद असायचा. नोटा वारंवार मोजताना खरं तर क्षणभर स्वर्ग सुखच मिळायचे! आणि मनात आपणही बर्यापैकी पैसेवाले आहोत हे मनोमनी सुखद वाटायचं! एक खरंय त्या वेळेस रोख पैसे देणे-घेणे करताना वेगळीच मजा असायची.
परवा मी रेस्टॅारंटमध्ये मुलांसह गेलो होतो. काउंटरवर बिलानुसार रोख पैसे देत होतो. काउंटरवर माझ्याखेरीज फारसे कोणी नव्हते. एवढ्यात आमचे 17 वर्षांचे नातू जवळ आले व हळूच कानात म्हणाले, आबा, कॅश का देत बसताय? ऑनलाइन पेमेंट करा की! मीही जरा चपापलोच. या डिजिटल जमान्यात आपण खरंच इतके मागासलेलो तर नाही? मनात जरा खजिल झालो व मनोमन नातवाची शिकवणी पक्की केली.
सध्या डिजिटलचा जमाना आहे.पण डिजिटल पेमेंट्सपूर्वी आपण (मी तरी) पैसे जाणीवपूर्वक खर्च करायचो, शक्यतो नोटाच द्यायचो. पाकीट उघडणे, नोटा मोजणे, त्या दुसर्याच्या हातात देणे – वा घेणे या प्रत्येक क्रिया आपल्याला खर्चाबद्दल विचार करायला लावायच्या.अर्थशास्त्रज्ञ याला पेमेंटची वेदना (पेन ऑफ पेइंग) म्हणतात (मी अर्थतज्ज्ञ नाही) एक मानसिक घर्षण जे नैसर्गिकरीत्या आपल्याला खर्चाबद्दल अधिक जागरूक बनवायचे.
आज, डिजिटल वॉलेट्समुळे ही जाणीव हळूहळू कमी होत चालली आहे. कॅशलेस इफेक्ट आपल्या खर्चाच्या मानसशास्त्राला बदलत आहे. जसजसे आपण कागदी पैशांपासून दूर जात आहोत, तसतसा खर्च करण्यावरचा तो नैसर्गिक अडसर कमी होत चालला आहे. प्रत्येक व्यवहार इतका सुलभ झाला आहे की, कधी कधी तो करताना आपल्याला त्याची जाणीवसुद्धा होत नसते.
उदाहरणार्थ, पूर्वी रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यावर बिल भरताना आपण नोटा मोजत असताना, त्या खर्चाची जाणीव व्हायची. आज फोनवर एक टॅप करून पेमेंट होते आणि आपण पुढे निघून जातो. त्या खर्चाचा विचारही करत नाही.
किंवा ऑनलाइन शॉपिंग करताना, पूर्वी कॅश ऑन डिलिव्हरी असताना वस्तू घेताना पैसे मोजावे लागायचे. आता तर ‘बाय नाउ’चे बटण दाबलं की झालं! त्यामुळे अनावश्यक खरेदीचं प्रमाण वाढलं आहे, असं मला वाटायला लागलंय.
व्यापक आर्थिक आणि व्यावसायिक वाढीच्या दृष्टिकोनातून हा बदल अत्यंत रंजक आहे. खर्च करण्यातला अडथळा कमी होत असताना, आपल्या ग्राहक वर्तणुकीत मोठे बदल होत आहेत. कॅशलेस व्यवहारांची सुलभता केवळ पैसे देण्याची पद्धत बदलत नाही – तर ती हळूहळू आपण किती खर्च करतो तेही वाढवत आहे. छोट्या-छोट्या खरेदीसुद्धा आजकाल सहज होतात. चहा-कॉफीसाठी, छोट्या नाश्त्यासाठी, रिक्षा-टॅक्सीसाठी डिजिटल पेमेंट करताना त्या खर्चाची नोंद मनात राहत नाही. महिना अखेर जेव्हा एकूण खर्चाचा ताळमेळ बघतो तेव्हा मात्र धक्का बसतो. या डिजिटल पेमेंट क्रांतीचे दोन पैलू आहेत… एका बाजूला ती आर्थिक विकास आणि सुविधा वाढवत असते तर दुसर्या बाजूला ती आपल्याला जाणीवपूर्वक खर्च करण्याच्या सवयीला आव्हान देत असते. आणि म्हणूनच आता खर्चाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील असे वाटते. विशेषतः मध्यमवर्गाला!
आपणास दररोजच्या खर्चाची नोंद ठेवणे, मासिक बजेट बनवणे, अनावश्यक खर्च टाळणे या सवयी लावून घ्याव्या लागतील. तंत्रज्ञानाने दिलेल्या सुविधांचा फायदा घेत असतानाच त्याच्या मर्यादाही आपण ओळखल्या पाहिजेत.
यासाठी एक सोपा उपाय आपण आपल्यापुरता करू शकतो… जसे की तो रुपये 1000 पर्यंतची खरेदी UPI ने करतो. एक हजार ते तीन हजारपर्यंतची खरेदी प्रत्यक्षात असेल तर कॅश आणि ऑनलाइन असेल तर क्रेडिट कार्डने करतो आणि तीन हजारपेक्षा जास्तची खरेदी क्रेडिट कार्डने करतो. कोणतीही गोष्ट impulse buy करत नाही. किमान 3 -4 दिवसांचा वेळ घेऊनच खरेदी करतो. ऑनलाइन खरेदी करताना आवडलेली गोष्ट लगेचच विकत न घेता कार्टमध्ये टाकून ठेवतो. 3 -4 दिवसांनंतरही ती घ्यावीशी वाटली तरच बर्याचदा विकत घेत असतो. सगळंच कसं हिशेबशीर. बघा तुम्हाला पटतं का?
हा रोख रकमेपासून डिजिटल पेमेंटचा ‘क्लिक’पर्यंतचा प्रवास आमच्यासारख्या वयस्कर लोकांना खरंच विस्मयकारक वाटत असतो.
डिजिटल पेमेंट म्हणजे केवळ तंत्रज्ञान नाही तर तो बदलत्या जीवनशैलीचा भाग झालेला आहे. आजोबांनाही QR कोड स्कॅन करताना पाहिलं की, बदलाची जाणीव होते. रोख पैशांचा काळ संपत नाही; पण डिजिटल व्यवहारांनी आपला वेग आणि विश्वास दोन्ही वाढवले आहेत एवढं नक्की.
शेवटी एवढंच – हातात मोबाइल, आणि बोटाने क्लिक केले की, व्यवहार आटोपतो! तोही झटपट. तर मग पेमेंटची वेदना कमी झाली नां? डिजिटल पेमेंटमुळे बघा पटतंय का!
Pain and swelling