पाटे शिवारात शॉर्टसर्किटमुळे गहू अन् कांदाबीज भस्मसात

चांदवड : वार्ताहर
तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असतानाच, सोमवारी (दि. 30) पाटे शिवारात महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे एका शेतकर्‍याच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत वाल्मीक माधवराव कासव यांचा सुमारे दोन बिघे उभा गहू आणि कांदा बियाणे जळून खाक
झाले आहे.
सोमवारी दुपारी तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाटे येथील गट नंबर 173 मध्ये वाल्मीक कासव यांचे गव्हाचे पीक काढणीला आले होते. मात्र, याच शेतातून गेलेल्या महावितरणच्या विद्युत तारा अनेक दिवसांपासून खाली लोंबकळत होत्या. वादळी वार्‍यामुळे या तारांचा एकमेकांशी स्पर्श झाला आणि उडालेल्या ठिणग्या थेट गव्हाच्या पिकात पडल्या. कोरड्या पिकाने क्षणात पेट घेतला आणि पाहता पाहता संपूर्ण पीक डोळ्यादेखत जळून खाक झाले.
या आगीची तीव्रता इतकी होती की, गव्हाच्या शेजारीच लावलेले कांदा बियाण्याचे (डोंगळे) पीकही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तालुक्यातील कांदा, मका आणि सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच आता या आगीच्या घटनेमुळे कासव कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

Wheat and onion seeds burnt due to short circuit in Pate Shivara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *