भोंदू खरातला निधीसाठी उदय सांगळे यांची मदत

नगराध्यक्ष उगले, नगरसेवक अ‍ॅड. जाधव यांची पत्रकार परिषद

सिन्नर : प्रतिनिधी
मिरगाव येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या ईशानेश्वर देवस्थान परिसरात शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे करण्यात आली आहेत. त्यासाठी स्थानिक युवानेते उदय सांगळे यांनी आपले राजकीय वजन वापरून पाठबळ दिल्याचा आरोप सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले आणि नगरसेवक अ‍ॅड. पंकज जाधव यांनी केला आहे.
जिल्हा परिषद तसेच तत्कालीन पालकमंत्री व इतर मंत्र्यांच्या माध्यमातून निधी मिळवून देण्यात संबंधित नेत्याची भूमिका असल्याचा दावा करत एसआयटीमार्फत चौकशी करून त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मंगळवारी (दि. 31) सिन्नर नगरपरिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत उगले व जाधव यांनी मंदिर परिसरातील शासकीय निधीतून करण्यात आलेल्या कामांची कागदपत्रे सादर केली. त्यांच्या म्हणण्यानुसार जिल्हा परिषदेच्या 15 व्या वित्त आयोगातून 22 एप्रिल 2021 रोजी काढलेल्या कार्यादेशानुसार मिरगाव येथे पाण्याची टाकी बांधकामासाठी आठ लाख 69 हजार 341 रुपयांची मंजुरी देण्यात आली होती.
ही टाकी टंचाईग्रस्त गावासाठी उभारणे अपेक्षित असताना ती ईशानेश्वर देवस्थान परिसरात बांधण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत श्री सिद्ध क्षेत्र ईशानेश्वर देवस्थान मंदिर विकासासाठी 72 लाख 40 हजार 476 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र खनिज विकास निधीअंतर्गत खाणबाधित क्षेत्रातील विकासकामांसाठी वापरणे अपेक्षित असलेला एक कोटी रुपयांचा निधी सिन्नर-शिर्डी मार्गावरून ईशानेश्वर देवस्थानाकडे जाणार्‍या रस्त्यासाठी खर्च करण्यात आल्याचे त्यांनी कागदपत्रांच्या आधारे सांगितले.
देवस्थानासाठी पाणी परवानगी तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली असून, पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच पालकमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना मंजुरी मिळवून देण्याच्या प्रक्रियेत संबंधित युवा नेत्याने सोपस्कार पूर्ण केल्याचा आरोपही उगले व जाधव यांनी केला.
यावेळी नगरसेवक अजय गोजरे, सुनील गवळी, प्रवीण जाधव, दत्ता हांडे, योगानंद गवळी आदी उपस्थित होते.

Uday Sangle’s help for Bhondu Kharat’s fund

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *