दस्त नोंदणीत विक्रमी वाढ
नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा नियोजन निधीच्या वापरात आदिवासी विकास विभागानेही उल्लेखनीय कामगिरी करत 434 कोटी रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च केला आहे. या निधीतून आदिवासी भागातील विकासकामांसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीवर भर देण्यात आला. या कामगिरीबद्दल प्रकल्पाधिकारी अर्पिता ठुबे यांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आर्थिक वर्षाच्या अखेरीस कोषागार विभागावर मोठा ताण होता. मार्च महिन्यात कोषागार कार्यालयाकडे तब्बल 7,405 बिले प्राप्त झाली होती. त्यानुसार विभागाने 134 कोटी 98 लाख 88 हजार रुपयांची देयके संबंधित विभागांना वितरित केली. त्यामुळे वर्षअखेर आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने वेगाने काम केल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात 46 हजार पेन्शनर्स
जिल्ह्यात 45 हजार 936 पेन्शनर्सधारक आहेत. महिन्याकाठी सर्व सेवानिवृत्तिधारकांना सुमारे 151 कोटी 52 लाख 56 हजार रुपये वितरित केले जातात, अशी माहिती जिल्हा लेखा व कोषागरे विभागाकडून देण्यात आली.
मार्चमध्ये दस्त नोंदणीत विक्रमी वाढ
यंदा 1,302 दस्त नोंदणीचा उच्चांक गाठण्यात आला, तर मागील वर्षी हा आकडा 1,197 होता. विशेष म्हणजे, 31 मार्च या शेवटच्या दिवशीच 62 दस्त नोंदणी झाली. मात्र, दस्त नोंदणी वाढूनही महसुलात घट दिसून आली. मागील वर्षी 15 कोटी 65 लाख 25 हजार 800 रुपयांचा महसूल मिळाला होता, तर यंदा 13 कोटी 66 लाख 33 हजार 620 रुपयांवर समाधान मानावे लागले. दस्त नोंदणीच्या संख्येपेक्षा व्यवहाराच्या मूल्यावर आधारित स्टॅम्प ड्युटीमुळे महसूल ठरत असल्याने हा फरक पडल्याचे स्पष्ट झाले.
विविध विभागांत गर्दी
महावीर जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असतानाही 31 मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग सुरू ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दिवसभर कार्यालयात उपस्थित राहून विविध विभागांच्या खर्चाचा आढावा घेत होते. विशेषतः जिल्हा नियोजन, कोषागार व नोंदणी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली.
Payments worth Rs 135 crores disbursed