लष्करी कारवाया जोरातच, जगभरात कच्च्या तेलाचे दर घसरले
तेहरान/तेल अवीव/वॉशिंग्टन :
पश्चिम आशियातील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा महिनाभराहून अधिक काळ पेटलेला वणवा लवकरच शमणार असे दिसतेय. एकीकडे लष्करी कारवाया जोरात आहेत, तर दुसरीकडे युद्ध संपण्याच्या शक्यता वाढल्याचे संकेत मिळत आहेत. इराणसोबतचे युद्ध कोणत्याही कराराशिवाय पुढील 2 ते 3 आठवड्यांत संपू शकते, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्यानंतर जगभरात कच्च्या तेलाचे दर घसरले असून, शेअर बाजारासह सोन्या-चांदीत मोठी तेजी आली आहे. या शांतता चर्चांच्या पार्श्वभूमीवर इराणने 18 अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. कुवेत विमानतळावर ड्रोन हल्ला केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, इराणने युद्धविरामाची इच्छा व्यक्त केली आहे; परंतु इराणने त्यास थेट दुजोरा दिलेला नाही. इराणी नेतृत्वाने मात्र भविष्यातील हल्ल्यांपासून हमी मिळाल्यास युद्धसमाप्तीची तयारी दर्शवली आहे.
ट्रम्प प्रशासनाने संकेत दिले की, अमेरिकेची लष्करी कारवाई लवकरच संपुष्टात येऊ शकते, पण इस्रायल अजूनही आक्रमक भूमिकेत आहे. तसेच नाटो देशांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याबद्दल अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे, ज्यामुळे पाश्चिमात्य आघाडीत मतभेद उघड झाले आहेत. प्रत्यक्ष रणभूमीवर, युद्ध आता एका अत्यंत भीषण आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. गेल्या 24 तासांत इराणमधील अंतर्गत सत्तापालटाचे संकेत, कुवेतवरील ड्रोन हल्ला आणि इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये ’बफर झोन’ तयार करण्यासाठी गाझाप्रमाणेच विध्वंस करण्याचा दिलेला इशारा, यामुळे जागतिक तणाव शिगेला पोहोचला आहे. ट्रम्प यांनी हे युद्ध पुढील 2-3 आठवड्यांत संपेल, असा दावा केला असला, तरी जमिनीवरची परिस्थिती मात्र वेगळेच चित्र दर्शवत आहे.
’इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड’चे इराणवर नियंत्रण
इस्रायल आणि आखाती प्रदेशात हवाई हल्ले, ड्रोन आक्रमणे आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच राहिले. इराणकडून आखाती समुद्रातील तेलवाहू जहाजांवर ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न झाल्याचे वृत्त आहे, तर इस्रायलने इराण व त्याच्या सहयोगी संघटनांवर लक्ष्यित हल्ले सुरू ठेवले आहेत. इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने शासनावर प्रभावी नियंत्रण (’डी फॅक्टो’ ताबा) मिळवल्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे युद्धाची दिशा अधिक कठोर होण्याची शक्यता आहे. शिवाय, इस्रायलने स्पष्ट केले आहे की, लढाई अजून काही आठवडे सुरू राहू शकते आणि त्यांनी प्रादेशिक पातळीवर नवीन धोरणात्मक युती निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
इराणचा ’तंत्रज्ञान युद्धा’चा इशारा
इराणच्या आयआरजीसी ने धमकी दिली आहे की, जर त्यांच्या नेत्यांच्या ’टार्गेटेड’ हत्या थांबल्या नाहीत, तर ते पल, गुगल आणि मेटा यांसारख्या 18 प्रमुख अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांच्या युनिट्सना लक्ष्य करतील. कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंधन टाक्यांवर इराणच्या ड्रोनने हल्ला केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भीषण आग लागल्याने हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
लेबनॉनमध्ये ’गाझा मॉडेल’ची पुनरावृत्ती
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी जाहीर केले की, इस्रायल दक्षिण लेबनॉनमधील सीमावर्ती गावांमधील सर्व घरे नष्ट करेल. उत्तर इस्रायल सुरक्षित होईपर्यंत 6 लाख विस्थापित लेबनीज नागरिकांना परत येऊ दिले जाणार नाही. इस्रायलने लेबनॉनमध्ये ’बफर झोन’ निर्माण करण्याची योजना आखली आहे. इस्रायली हवाई दलाने बेरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाच्या दक्षिण आघाडीचा कमांडर हज युसूफ इस्माईल हाशम ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलने म्हटले आहे की, इराणमधील त्यांच्या मोहिमेचे 100% लष्करी उद्दिष्टे 24 तासांत पूर्ण होतील. इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांसाठी फाशीची शिक्षा अनिवार्य करणारा नवा कायदा मंजूर केला आहे, ज्याचे पडसाद संपूर्ण पश्चिम आशियात उमटत आहेत.
The flames of war will subside!