निफाड पूर्व भागात अवकाळीसह गारपीट

कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू, मका पिकांचेे नुकसान; पंचनाम्याची मागणी

भाग बदलून पावसाची हजेरी.
वार्‍यामुळे द्राक्षबागांचे नुकसान.
उघड्यावरील बेदाणाही भिजला.
नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हतबल.
तातडीने मदतीची मागणी.
ठोस उपाययोजनांची गरज.

निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्याच्या पूर्व भागात गुरुवारी (दि.2) दुपारनंतर अचानक झालेल्या वादळी वार्‍याबरोेबर गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. सुमारे दीड तास सुरू असलेल्या या पावसासोबत काही ठिकाणी तुरळक, तर अनेक ठिकाणी सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्याने कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस भाग बदलत हजेरी लावत असल्याने हातात आलेली पिके वाया जात आहे. शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

निफाडसह कोठुरे, जळगाव, शिवरे, नैताळे, खानगाव थडी, सारोळे थडी, यासह तालुक्याच्या पूर्व भागातील देवगाव, कानळद, कोळगाव, वाकद, शिरवाडे, मानोरी, भरवस, वाहेगाव, नांदगाव, डोंगरगाव, धारणगाव, खेडलेझुंगे या गावांमध्ये जोराच्या वार्‍यामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी द्राक्षेघडांना फटका बसला आहे. डाळिंब बागांमध्ये फळगळ झाली आहे. कांदा पिकावर पावसाचे पाणी साचल्याने कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. गहू व मका पिकांनाही पावसाचा मोठा फटका बसल्याने उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दिंडोरी तास आणि नांदूरमध्यमेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वार्‍यात गारा बरसल्याने परिसरातील कांदा व गहू पीक भुईसपाट झाले आहे. बेदाणा बनविणार्‍या व्यावसायिकांचा उघड्यावर असणार बेदाणा पावसामुळे ओला झाला. त्यामुळे या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या शेती खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना वारंवार येणार्‍या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीत नवनवीन प्रयोग करणे म्हणजे कर्जाचा डोंगर उभा करण्यासारखे झाले आहे. अशा परिस्थितीत तरुण शेतकरी शेतीकडे पाठ फिरवतील, अशी भीती व्यक्त होत आहे. कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई जाहीर करावी.
सद्य:स्थितीत शेतकरी हवालदिल झाला असून, त्वरित मदत मिळणे अत्यावश्यक आहे. महसूल व कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून बाधित शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वारंवार होणार्‍या अवकाळी पावसामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाचा फटका माझ्या कांदा पिकाला बसला आहे. गारांमुळे उरल्यासरल्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. कांदापीक पूर्ण भुईसपाट झाल्याने कांदा पिकावर झालेला खर्च निघणार नाही. शासनाने पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी.
-सचिन जाधव, शेतकरी, दिंडोरी तास

Hailstorm with thunderstorm in eastern Niphad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *