अनुदान रखडल्याने घरकुल लाभार्थी हवालदिल

पावसामुळे घराअभावी लाभार्थ्यांचे हाल; किसान सभेचा आक्रमक पवित्रा

नोव्हेंबरपासून अनुदान नाही.
घरकुलाच्या अर्धवट भिंती उभ्या.
पावसामुळे निवार्‍याचा प्रश्न.
उघड्यावर पडला संसार.
किसान सभा आंदोलनाच्या पवित्र्यात.

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सरकार सवार्ंसाठी घरे अभियानांतर्गत घरकुलाच्या विविध योजना राबवत आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी पक्के घर देण्याचा वायदा सरकारने केला. मात्र, घरकुल मंजूर लाभार्थीना वेळेत हप्ता मिळत नसल्याने तोंडावर आलेल्या पावसाळ्यात करायचे काय? या विवंचनेत घरकुलाचा लाभार्थी सापडला आहे. ग्रामपंचायत घरकुल लाभार्थीच्या यादीत नाव यावे म्हणून धडपडणारा ग्रामस्थ नंतर मात्र पश्चाताप व्यक्त करत आहे.
गेल्या काही वर्षांत सर्वांसाठी घरे अभियानांतर्गत गावागावात लाभार्थ्यांची संख्या शेकड्याने झाली आहे. स्वत:च्या पक्क्या घराचे स्वप्न साकारणार, या आनंदाने पावसाळा संपताच झोपडी अथवा कच्चे घर पाडले व त्यानंतर घरकुलाचे हप्ते मिळावेत म्हणून पंचायत समिती आणि संबंधित अधिकार्‍यांकडे हेलपाटे मारत आहे. अर्धवट बांधलेल्या भिंती, उघड्यावर पडलेले तोडकामोडका संसार, असे दीनवाणे दृश्य गावोगावी नजरेस पडत आहे. महिला, मुले, वयोवृद्ध आणि एखाददुसरा जित्राब पावसापासून आडोशाला न्यायचे कुठे, असा प्रश्न भेडसावत आहे. नोव्हेंबरपासून घरकुलाचे हप्ते थकले आहेत. बाजारात उधार -उसनवारी करत होती नव्हती ती पत संपली आहे. पक्क्या घराच्या आशेने मोलमजुरीला जाता आले नाही. शासनाने लाभार्थीना जो काही आर्थिक लाभ द्यायचा असेल, तो येत्या आठवडाभरात दिला, तर त्यामधून अर्धवट राहिलेले घराचे काम पूर्ण करणे शक्य होईल. अन्यथा पावसाला सुरुवात झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाने मदत करण्याची वेळ येईल, अशी स्थिती दिसून येत आहे.
याबाबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची भेट घेऊन एकूण परिस्थिती निदर्शनास आणून दिली. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात गेल्या नोव्हेंबरपासून घरकुल लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही. त्यामुळे घरकुलांची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत, घरकुलांचे सर्व कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत. प्रशासनाने अनुदान वेळेत देणे गरजेचे होते. कच्च्या घरातून बाहेर पडलेल्या या कुटुंबांना पावसाळ्यात राहण्यासाठी छत उरणार नाही. अद्याप घरकुल कामावरील रोजगार हमी योजनेची मजुरी मिळालेली नाही.
प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे होणारी गैरसोय थांबवण्याच्या दृष्टीने त्वरित कार्यवाही करावी व अनुदान मिळावे, अशी मागणी आहे. दुर्लक्ष केल्यास सर्व घरकुल लाभार्थी व किसान सभा तीव्र आंदोलन करेल. त्यामुळे उद्भवणार्‍या सर्व परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे.

शासनाने अनुदान न दिल्याने घरकुलांचे काम ठप्प झाले आहे. घरकुलांचे लाभार्थी अडचणीत सापडले आहेत.तातडीने लाभार्थीना पैसे द्यावेत म्हणजे त्यांना पावसाला सुरुवात होण्यापूर्वी रखडलेले काम पूर्ण करता येईल. याबाबत लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
-इरफान शेख, सचिव, किसान सभा, नाशिक

Housing beneficiaries in limbo due to grant delay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *