सिन्नर तालुक्यात वादळी वार्यासह विजांचा कडकडाट; सोमठाणे परिसरात सुमारे 400 हेक्टर कांदा बाधित
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यात गुरुवारी (दि.2) दुपारी वादळी वार्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांना मोठा फटका बसला. काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या गहू, हरभरा आणि उन्हाळी कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, संध्याकाळी उशिरापर्यंत तालुक्याच्या बहुतेक भागांत पावसाची रिमझिम सुरू होती.
सिन्नर शहरात दुपारी दोनच्या सुमारास पावसाने जोर धरला. तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील वावी परिसरात वादळी वार्यासह विजांचा कडकडाट झाला. पाथरे, पांगरी, रामपूर, उजनी, घोटेवाडी, वल्हेवाडी, निर्हाळे, चास, गोंदे आदी भागांतही अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वार्याच्या झोतामुळे पिके आडवी पडल्याचे चित्र दिसून आले.
कहांडळवाडी येथे रवी कहांडळ यांच्या शेडवर विजेचा खांब कोसळल्याची घटना घडली. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली. शहा व पंचाळे परिसरात गारपीटही झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या आठवड्यातील गारपिटीने झोडपलेल्या सोमठाणे परिसराला गुरुवारी पुन्हा अवकाळीचा फटका बसला. या भागात सुमारे 400 हेक्टरवरील कांदा तसेच सुमारे 50 हेक्टरवरील डाळिंबबागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रभाकर श्रीपत कोकाटे, राजेंद्र त्र्यंबक कोकाटे, नितीन पोपटराव कोकाटे, मधुकर सूर्यभान धोक्रट, त्र्यंबक रंगनाथ कोकाटे, कचेश्वर काळू कोकाटे, बाबासाहेब गोपीनाथ पदाडे, दिनकर तुकाराम कोकाटे, विजय रामहरी कोकाटे, प्रमोद कारभारी कदम आदी सोमठाणे येथील शेतकर्यांच्या पिकांना मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांची भेट घेऊन नुकसानीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. महसूल व कृषी विभागाने तातडीने बाधित भागाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि शेतकर्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पंचनाम्याचे आदेश
तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याने आमदार माणिकराव कोकाटे यांनी महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तहसीलदार सुरेंद्र देशमुख आणि तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांना याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
चास येथील श्री बालाजी मंदिरावर वादळी पावसादरम्यान वीज कोसळली. या घटनेत मंदिराचा कळस व लोखंडी बॅक्रेट वाकल्याचे दिसून आले. मात्र, मंदिराच्या मुख्य बांधकामाचे मोठे नुकसान झाले नाही. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते बंडूनाना भाबड यांनी दिली.
Unseasonal weather wreaks havoc; Major damage to onion, wheat, gram crops