मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर फार मोठा झाला नाही. भारतावरही झाला नाही. उलट रशियाने भारताला स्वस्तात खनिज तेल दिले. पश्चिम आशियात संघर्ष सुरू होण्याआधी रशियाकडून भारताने तेल घेऊ नये म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दबाव आणला. भारताने रशियाकडून तेल घेणे बंद केले की नाही, याविषयी सरकारकडून कोणतीही स्पष्टता नाही. भारताला इराणसह आखाती देशांकडून तेल मिळत होतेच. यावर्षी 28
फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केले. त्याचा परिणाम जगावर झाला. इराणच्या ताब्यात असलेली हॉर्मझ सामुद्रधुनी बंद झाल्याने खनिज तेल व गॅसच्या पुरवठ्यांवर परिणाम झाला. भारतातही टंचाई जाणवत आहे. भारताच्या तेलवाहू व गॅसवाहू जहाजांना इराणने सुरक्षित मार्ग उपलब्ध करुन दिला. त्याआधी अमेरिकेने भारताला रशियाकडून खनिज तेल घेण्यास सवलत दिली. युक्रेन युद्धापेक्षा इराण युद्धाचे चटके भारताला अधिक बसत आहेत. इराण युद्ध कधी संपेल, याचे भाकीत कोणीही करू शकत नाही; परंतु युद्ध लांबण्याची चिन्हे दिसत असताना भारतासाठी एक वाईट बातमी म्हणजे, यंदा नैऋत्य मान्सून म्हणजे मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या हवामान विभागाने तसा अंदाज वर्तविला आहे. त्याच्या आठ दिवस आधी स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. सरकारी व खासगी संस्थांचा अंदाज जवळपास सारखाच आहे. खासगी अंदाजाविषयी शंका घेतल्या जातात. सरकारच्या हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरविता येत नाही. इराण युद्धाचे चटके भारत सहन करत असून, अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरत आहे. निर्यात रोडावल्याने विदेशी चलनसाठा कमी झाला आहे. शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार बाहेर पडत आहेत, महागाई वाढत आहे, अशा विविध घडामोडी घडत असताना यंदा पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज चिंताजनक आहे. भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून असते. यंदा पाऊसच कमी पडला, तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, असे स्पष्ट संकेत आहेत. भारतीय हवामान विभागाने यावर्षीचा पहिला अंदाज सोमवारी, 13 एप्रिल 2026 रोजी जाहीर केला. यावर्षी देशात सरासरीच्या 92 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे प्रमाण ’सामान्यपेक्षा कमी’ या वर्गवारीतील आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी ही माहिती दिली. यंदाच्या मान्सूनवर ’एल निनो’ या हवामान स्थितीचे सावट राहण्याची शक्यता आहे. डॉ. मोहापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर या काळात ’एल निनो’ची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची भीती असते. याच काळात हिंदी महासागरात ’इंडियन ओशन डायपोल’ सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. हा सकारात्मक आयओडी ’एल निनो’च्या नकारात्मक प्रभावाला रोखण्यास मदत करतो, त्यामुळे पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघू शकते. जून ते ऑगस्टदरम्यान पावसाची स्थिती सुरुवातीला सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. ही एक अपेक्षा आहे. हिंद महासागरातील तापमानातील बदलांच्या या चक्राला इंडियन ओशन डायपोल किंवा ’इंडियन निनो’ म्हणतात. यंदा प्रशांत महासागरात ’एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता असल्याने पावसात घट होण्याची शक्यता आहे. इंडियन ओशन डायपोल सकारात्मक झाला, तर एल निनोचा प्रभाव कमी होऊन भारतात चांगला पाऊस पडू शकतो. हा अंदाज थोडासा दिलासादायक आहे. एकूणच अंदाज शेतकर्‍यांची चिंता वाढविणारा आहे. याशिवाय उद्योजक आणि
व्यावसायिकांची चिंता वाढविणारा अंदाज आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही कमी पावसाची झळ बसणार आहे. पाऊस कमी झाला, तर पुढे अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई वाढेल. दुसरीकडे, कृषीवर आधारित उद्योगांना कच्चा माल कमी प्रमाणात उपलब्ध होईल. या सर्वांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडेल. युद्धाने परिस्थिती बिकट झाली आहे. त्यातच युद्ध लांबण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत पाऊस कमी झाला, तर पुढच्या वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण होईल. एकूणच परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारांनी आतापासूनच संभाव्य उपाययोजनांचा विचार करणे आवश्यक आहे. हवामानतज्ज्ञ, हवामान संस्था किंवा वेधशाळा अंदाज वर्तवून सरकार आणि लोकांना सजग/सावध करतात. यंदाच्या दोन्ही अंदाजांनी तेच केले आहे. पाऊस कमी पडला, तर पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चारापाण्याची टंचाई निर्माण होईल. याशिवाय अन्नधान्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन सरकारने आतापासूनच नियोजन करायला पाहिजे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या 94 टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटकडून वर्तविण्यात आला आहे. हंगामाच्या दुसर्‍या टप्प्यात एल निनोचा प्रभाव वाढणार आहे. जून महिन्यात मान्सून स्थिर राहणार आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तीव्रता कमी होणार आहे. देशातील मध्य आणि उत्तर पश्चिम भागांमध्ये पावसाची कमतरता जाणवणार असल्याचा अंदाजही‘स्कायमेट’ने वर्तविला आहे. यंदा सरासरीहून कमी पाऊस पडण्याची शक्यता सर्वांत अधिक म्हणजे 40 टक्के आहे, तर यंदा दुष्काळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता 30 टक्के आहे. ‘स्कायमेट’ने विविध हवामान स्थितीचा अभ्यासकरून हा अंदाज वर्तवला आहे. यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता आहे. तो शरद ऋतूत अधिक तीव्र होऊ शकतो, असा अंदाज आहे. त्याचा प्रभाव मान्सूनवर पडणार आहे. त्यामुळे मान्सूनचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’सह इंडियन ओशन डिपोल (आयओडी) म्हणजेच हिंदी महासागराच्या तपमानाच्या फरकाचा परिणामही मान्सूनवर होत असतो. या हंगामात सकारात्मक आयओडी निर्माण झाल्यास तो ‘एल निनो’च्या नकारात्मक परिणामांना काही प्रमाणात कमी करू शकतो. आयओडी सकारात्मक स्थितीत असेल तर सुरुवातीला मान्सूनला अनुकूल स्थिती असेल. हंगामाच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण कमी असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या शक्यतांमुळे भारताच्या विविध प्रांतात पावसाचे प्रमाण भिन्न असेल, असा अंदाज आहे. मध्य आणि पश्चिम भारतातील हवामानाचा प्रभाव असणार्‍या भागांत कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने पंजाब, हरियाना आणि राजस्थानमध्ये विशेषत: ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. भारताच्या पूर्व आणि ईशान्य भागात तुलनेने चांगला पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जून महिन्यात साधारण सरासरीइतकाच किंवा थोडा जास्त पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. जुलै महिन्यात सरासरी इतका किंवा त्याहूनही कमी पावसाची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी (60 टक्के) असेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीहून कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यंदा पावसाची सुरुवात अनुकूल होणार असली तरीही त्यानंतर पाऊस अनियमित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाचा अंदाज यापेक्षा वेगळा नाही. भारतीय हवामान विभागाचा आणखी एक अंदाज मे महिन्याच्या शेवटी येणार आहे. तोपर्यंत एल निनो स्थिती बदलली किंवा काही बदल झाले, तर सकारात्मक अंदाज वर्तवला जाऊ शकतो. ’स्कायमेट’कडूनही आणखी अंदाज येऊ शकतो. पण दोन्ही संस्थांचे पहिले अंदाज चिंताजनक आहेत.

Monsoon forecast is worrisome

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *