शिवडीला वीजतारांच्या घर्षणातून आग

शेतकर्‍याचे अडीच हजार बांबू खाक

निफाड : विशेष प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील शिवडी शिवारातील जयकृष्ण खापरे या शेतकर्‍याचेे शेतातील लोंबकळणार्‍या वीजतारांच्या घर्षणाने निर्माण झालेल्या आगीच्या ठिणगीतून अचानकपणे शेतातील द्राक्षबागेसाठी आणलेले बांबू आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यातून मोठी वित्तहानी झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली.
शिवारातील मध्य रेल्वेलगत असलेल्या खापरे-सांगळे वस्तीवरील जयकृष्ण खापरे यांचे शेतातील घरालगत द्राक्षबागेच्या आधारासाठी आवश्यक असलेले सुमारे अडीच हजारांवर बांबू खरेदी करून ठेवलेले होते. त्यालगत एक ट्रॅक्टर उभा होता. शेतातून गेलेल्या वीजवाहक तारा या लोंबकळणार्‍या होत्या. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी वीज वितरण कंपनीला सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले होते. बुधवारी दुपारी जोरदार वारा वाहत असताना विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट होऊन झालेल्या घर्षणातून आगीचे लोळ शेतातील बांबूवर पडले अन् आग लागली.
सांगळे वस्तीवरील नागरिकांनी धुराचे लोळ पाहून घटनास्थळी धाव घेतली असता, आगीने मोठे रूप धारण केले होते. त्या ठिकाणी असलेला ट्रॅक्टर स्थानिकांनी शिताफीने बाजूला घेतला, मात्र आगीच्या रौद्र रूपात सर्व बांबू जळून खाक झाले. यात सुमारे एक लाखावर रुपयांची वित्तहानी झाली आहे.

Fire breaks out in Sewri due to friction from electric wires

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *