सटाण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; घरफोडीचा प्रयत्न

सटाणा : प्रतिनिधी
शहरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून, मंगळवारी (दि.7) पहाटे सलग दोन ठिकाणी घरफोडीचे प्रयत्न आणि एका ठिकाणी घरफोडीची घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
झाले आहे.
डी.बी.नगर, चौगाव रोड व नामपूर रोड परिसरातील सह्याद्री नावाच्या बंगल्यात पहाटे सुमारे 3 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर नामदेव देवरे यांच्या बंगल्याच्या हॉलच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी आत हात घालून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील सदस्यांना आवाज आल्याने त्यांनी तत्काळ धाव घेतली असता, खिडकीजवळ तीन संशयित चोरटे दिसून आले. नागरिकांनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी कंपाउंडवरून उड्या मारत तात्काळ पळ काढला.
दरम्यान, नामपूर रोडवरील श्रीकृष्णनगर परिसरात याच सुमारास दुसरी घटना घडली. सेवानिवृत्त शिक्षक वामनराव खैरनार यांच्या घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कुलूप व कोयंडा तोडून त्यांनी घरातील कपाटे उघडून सामान अस्ताव्यस्त केले. सुदैवाने खैरनार कुटुंब सध्या नाशिक येथे वास्तव्यास असल्याने घरात कोणतीही मौल्यवान वस्तू नव्हती. त्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
याशिवाय, सीमानगर परिसरात मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या दरम्यान तीन संशयित चोरट्यांचा वावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. हेच टोळके विविध भागात फिरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्याने विकसित होत असलेल्या वसाहतींमध्ये पहाटेच्या सुमारास घरफोडीच्या घटना घडत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *