सिन्नरमध्ये घरफोडी; सव्वादोन लाखांचे दागिने लंपास

सिन्नर : प्रतिनिधी
शहरातील देशमुखनगर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 2 लाख 33 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण
झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सीता कृष्णा कुंदे (31, रा. हिराबाई देशमुखनगर, सिन्नर, मूळ रा. चाटोरी, ता. निफाड) या माळेगाव एमआयडीसी येथील जनरल मेल कंपनीत कामासाठी गेल्या होत्या. 7 एप्रिल रोजी दुपारी 3 ते रात्री 11.30 या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये 1 लाख रुपये किमतीचे 1 तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, 70 हजार रुपये किमतीचे 7 ग्रॅम वजनाचे दुसरे मंगळसूत्र, 50 हजार रुपये किमतीची सोन्याची कानफुले, 10 हजार रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स तसेच चांदीची चेन व कडे असा एकूण 2 लाख 33 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 305, 331(3) व 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पारधी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनी घटनास्थळी भेट देऊन
पाहणी केली.

Burglary in Sinnar; Jewelry worth Rs. 2.5 lakhs stolen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *