अलविदा आशाताई!

गानसम्राज्ञीचा देह अनंतात विलीन;
आशा भोसलेंना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

मुंबई : विशेष प्रतिनिधी
गानसम्राज्ञी आशा भोसले (वय 92) यांचे पार्थिव सोमवारी (दि. 13) संध्याकाळी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अनंतात विलीन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई पोलिसांनी विशेष मानवंदना देत या महान गायिकेला अखेरचा सलाम ठोकला.
आशाताईंच्या अंतिम प्रवासात चाहत्यांचा जनसागर लोटला होता. आशाताईंचे पार्थिव त्यांच्या ’कासा ग्रँड’ या निवासस्थानावरून शिवाजी पार्ककडे निघाले, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची अलोट गर्दी उसळली होती. ’आशाताई अमर रहे’च्या घोषणांनी दादरचा परिसर दुमदुमून गेला होता. आपल्या लाडक्या ’ताईं’चा हा शेवटचा प्रवास पाहून हजारो डोळे पाणावले होते, जणू सूर-ताल अन् शब्दांनाही रडू फुटलं होतं.
ज्या स्वरांनी पिढ्यान्पिढ्यांचे मनोरंजन केले, ज्या आवाजाने कधी प्रेम शिकवले, तर कधी विरहाच्या वेदना सुसह्य केल्या, तो आवाज आता कायमचा शांत झाला. त्यांच्या अंत्ययात्रेत अन् शेवटच्या संस्कार प्रसंगीही, त्यांच्या ’अभी ना जाओ छोडके…’ या गाण्याच्या ओळी पुनः पुन्हा आठवल्या जात होत्या. वयाच्या 92 व्या वर्षीही त्यांची संगीताप्रति असलेली ओढ तसूभरही कमी झाली नव्हती. त्यांच्या सात दशकांच्या जादुई प्रवास शेवटी कायमचा िवसावला.
आशाताईंचे जाणे म्हणजे केवळ एका गायिकेचे जाणे नव्हे, तर भारतीय संगीतातील एका तेजस्वी पर्वाचा शेवट आहे. शास्त्रीय संगीत असो, गझल असो किंवा धडाकेबाज कॅबरे गाणी, प्रत्येक प्रकारात त्यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटवला होता. लख्ख ’स्वर’ जरी कायमचा निमला असला, तरी त्यांचे ’सूर’ मात्र येणार्‍या अनेक पिढ्यांच्या मनात अजरामर राहतील.

शिवाजी पार्क येथे अंत्यविधी

शिवाजी पार्क येथे झालेल्या अंत्यविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, तसेच चित्रपटसृष्टीतील दिग्गज उपस्थित होते. सचिन तेंडुलकर, तब्बू, रितेश देशमुख, आशा पारेख आणि जावेद अली यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आशाताईंच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे, विशेषतः मुलगा आनंद भोसले आणि नात जनाई भोसले यांचे सांत्वन केले. भारतीय संगीताच्या क्षितिजावरची एक लखलखती ’आशा’ विझली असली तरी आठवणींच्या हिंदोळ्यावर त्या नेहमीच जिवंत राहतील, अशीच भावना यावेळी चाहत्यांनी व्यक्त केली.

Goodbye, Ashatai!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *