मजा करणारे, कष्ट करणारे समजून घ्या

संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले, कष्ट करणारे मजूर व दुसरा वर्ग पाहिला व चीड आली. तो वर्ग म्हणजे जळगाव, धुळ्यासह खानदेशातील लाख-दोन लाख यात्रेकरू जे पायी गडावर जातात. कष्ट करून पोट भरणारा कोकणी समाज, शे-दोनशे किलोमीटरवरून बागायती शेतीत तात्पुरता मजुरी करण्यासाठी येतो तो वर्ग. सकाळी 7 ते सायंकाळी सहा ऊन, वारा कशाचीच पर्वा न करता उन्हाळी कांदे काढणे, खांडून चाळीत भरणे यासाठी महिनाभरासाठी दरवर्षी येतात तसेच दिवाळीनंतर मका कापणीसाठी येतात. प्रचंड कष्ट करून दोन पैसे मिळवतात व आपल्या गावी जातात. दोन टप्प्यांत दोन महिने वेगवेगळ्या गावांत राहून कुणालाच त्रास देत नाहीत. प्रामाणिकपणे घामाचे दोन पैसे कमवतात. अंगावर नीट कपडे नाहीत. अशी त्यांची अवस्था बघून त्यांना व त्यांच्या कष्टाला सलाम करावासा वाटतो.
दुसरा वर्ग देवीच्या नावाने चांगभलेवाला. गडावरील यात्रेच्या काळात सर्व काम संपलेले असते. मग देवीच्या श्रद्धेसाठी पायी निघतात. पण आता राजकारणी व व्यापारी भंडारे, चहा-पाणी, खायची चंगळ करीत असल्याने श्रद्ध विषयच संपल्यात जमा आहे. पूर्वी पायी जात पण संख्या एकदम कमी. कारण विकतच किंवा सोबत आणलेल्या शिदोरीवर ही यात्रा होत असे. म्हणजे खरे श्रद्धाळू व बर्‍यापैकी वय असलेलेच गडावर पायी जात होते. पण अलीकडे ही संख्या लाख-दोन लाख झाल्याने अनेक समस्या तयार होत आहेत, ही चिंतेची बाब झाली आहे. पोलीस काय सैनिकसुद्धा यांना शिस्त लावू शकणार नाहीत अशी बेशिस्त सर्वत्र दिसते.
मुंबईहून शिर्डीला पायी जाणारे जे भाविक असतात ते प्रचंड शिस्त पाळतात. कुणालाच ञास होणार नाही याची काळजी घेतात. पण गडावर फक्त एन्जॉय व दहा टक्के खरे भाविक हे कटू सत्य आहे. रस्त्यात वर्षभरात होत नाही अशी चंगळ फुकटात होते. अन्नाचे वाटप मोठे. खायचे पदार्थ ताक, लस्सी, बिस्कीट, खिचडी व अनेक पदार्थ दानशूरांचे जे असतात ते मागे घेऊन, अहो घ्या ना, पण हे पुढे चालत असतात. शेवटी एक किलोमीटरवर व्यवस्था. मग खाऊन किती खाणार. पाण्याच्या बाटल्या डोक्यावर व रस्त्यावर ओतून देतात. सर्वत्र पर्यावरणाचे वाटोळे. कारण सर्वच प्लास्टिक असते. फुकट मिळत नाही. दारू, गुटखा, तंबाखू व अन्य वस्तू. या आठवड्यात धुळे ते नांदुरी किमान पाच कोटींची दारू विक्री होत असावी. तर दोन कोटींचा बंदी असलेला गुटखा, तंबाखू व विडी, सिगारेटची विक्री होत असावी.
दुसरा वाईट प्रकार कर्कश आवाजाचे डी.जे., ढोल-ताशे, बँड रस्त्यावर राहणार्‍यांना प्रचंड त्रास. त्यातच जागा मिळेल तेथे दुकान, घर काही न बघता सकाळचे विधी होतात. त्रास झाला तरी बोलायची सोय नाही हे तथाकथित देवीभक्त अंगावरच येतात. तासभर डी.जे. वाजत होता एकाच ठिकाणी दुकानासमोर.राहवले नाही, जवळ गेलो. पुढे निघून जा नाही तर आवाज कमी करा. मला बघताच दहा टगे काय झाले, काय झाले जोरात विचारायला आले, पण कुणीतरी त्यांना कानमंत्र दिला. तो डी.जे. बंद झाला.
बेडवर असलेला अनेक वर्षांपासून प्रचंड आजारी असलेल्या कल्पेश निकमने त्याची आपबीती मला कळवली. त्याच्या घराजवळच धांगडधिंगा सुरू केला. त्याने तब्येतीचे समजून दिले पण ते अर्धा तास शिवीगाळ करीत राहिले, हा चोरासारखा ऐकत राहिला. मग यांना देवीचे भक्त का म्हणावे? तरुणाईला आई-बाप असे मोकाट का सोडतात, हा पण प्रश्नच आहे. आठवडाभर आपला मुलगा-मुलगी सुरक्षित आहेत का, याचे भान भावनेपोटी ठेवत नाहीत. म्हणून उन्हातान्हात दिवसभर कांदे काढणारे गरीब कोकणी मजूर व हे दोन लाख आठवडा वाया घालतात याचा विचार दानशूर, अन्नदाते करतील का, तर नाही. कारण यातील अनेक अन्नाला जागून निवडणुकीत सतरंज्या उचलणारे असतात व म्हणून खर्च करतात. पण तरुणाईला कष्टाचे महत्त्व कोण सांगेल. आता काही म्हणतील त्यांची श्रद्धा आहे. हिंदू आहोत पण अपेक्षा शिस्तीची आहे. कुणाच्या भावना दुखवायची नाही हे समजून घेतले तर बरे.

Understand those who have fun and those who work hard.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *