रेशन धान्य वितरणात डिजिटल क्रांती

एटीएमद्वारे धान्य वितरणाची नवी प्रणाली

नाशिक : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील सुमारे पाच लाख रेशन दुकानांमध्ये एटीएमसारख्या मशीनद्वारे (ग्रेन एटीएम) धान्य वितरण प्रणाली लागू करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू करण्याचे निश्चित केले असून, त्याअंतर्गत महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर नाशिक आणि नागपूर या दोन जिल्ह्यांची पायलट प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी लवकरच आधुनिक ‘ग्रेन एटीएम’ मशीन बसवून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे
24 तास सेवा, गोंधळाला आळा
सध्याच्या रेशन दुकानांवरील गर्दी, कामकाजाच्या वेळेची मर्यादा आणि वितरणातील गोंधळ यावर ही प्रणाली प्रभावी उपाय ठरणार आहे. ‘ग्रेन एटीएम’मुळे लाभार्थ्यांना 24 तास कधीही धान्य घेण्याची सुविधा मिळणार असून, रेशन दुकानांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.स्वयंचलित प्रणालीमुळे धान्य वितरणातील संभाव्य गैरव्यवहार रोखण्यास मदत होणार आहे. प्रत्येक व्यवहाराची डिजिटल नोंद राहणार असल्याने पारदर्शकता वाढेल.
भारतीय तंत्रज्ञानाची झेप
ही संपूर्ण प्रणाली भारतीय तंत्रज्ञानावर आधारित असून, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत मोफत अन्नधान्य वितरण अधिक गतिमान आणि कार्यक्षम करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार यातून दिसून येतो. ‘ग्रेन एटीएम’ ही संकल्पना रेशन व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवणारी ठरणार असून, नाशिक आणि नागपूरमधील पायलट प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यभर आणि देशभर ही प्रणाली लवकरच विस्तारली जाण्याची शक्यता आहे.

कशी असेल नवी प्रणाली?
नव्या यंत्रणेत लाभार्थ्यांची ओळख अंगठ्याच्या ठशाद्वारे (बायोमेट्रिक) केली जाईल. ओळख पटताच मशीनमधून निर्धारित प्रमाणात धान्य स्वयंचलितपणे वितरित होईल. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत जलद असून, अवघ्या 30 सेकंदांत 25 ते 30 किलो धान्य मोजण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे.

‘वन नेशन, वन रेशन’ला बळ
केंद्र सरकारच्या ‘वन नेशन, वन रेशन’ कार्ड या संकल्पनेला या प्रणालीमुळे मोठा आधार मिळणार आहे. एटीएम कार्डसारख्या सुविधेमुळे लाभार्थी देशातील कोणत्याही भागात जाऊन कोणत्याही रेशन दुकानातून धान्य मिळवू शकतील.

Digital revolution in ration food distribution

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *