जुने नाशिक : वार्ताहर
येथील नानावली परिसरातील म्हशींच्या गोठ्याला काल (दि.23) सायंकाळी अचानक लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले. यात सुमारे सात ते आठ जनावरांना दुखापत झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. भरउन्हात पत्र्याचे शेड व लाकडांच्या बल्ल्यांमुळे आगीने क्षणातच उग्र रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झाली. मुरलीधर जाधव यांच्या मालकीच्या गोठ्याला आग लागली होती. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सुरुवातीला गोठ्यातून धूर निघताना दिसला आणि काही क्षणांतच ज्वाळांनी संपूर्ण गोठा वेढला. परिसरात घरे जवळजवळ असल्याने आग शेजारील घरांपर्यंत पोहोचण्याची भीती निर्माण झाली होती. या धोकादायक परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी कोणतीही पर्वा न करता तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विशेषतः परिसरातील तरुणांनी धाडस दाखवत गोठ्यात अडकलेल्या जनावरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काही जनावरे सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले; मात्र आगीचा वेग प्रचंड असल्याने अनेक जनावरे किरकोळ भाजली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आग विझविण्यासाठी लीडिंग फायरमन के. टी. पाटील, आर. पी. मोरे, बी. एन. खोडे, फायरमन अथर्व दुनबळे, अभिषेक बैरागी, अभिजीत आव्हाड, वाहनचालक जयंत सांत्रस, एम. डी. कदम यांनी परिश्रम घेतले.
Massive fire breaks out at a cowshed in old Nashik