चुकीचा अर्थ घेऊ नका; सराफ व्यावसायिकांचे मत
नाशिक : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलनात बचत आणि इंधनवापर नियंत्रणाबाबत केलेल्या आवाहनाचा चुकीचा अर्थ काढून सोन्याच्या खरेदीबाबत संभ्रम निर्माण करण्याची गरज नसल्याचे मत नाशिकमधील सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केले.
जागतिक अस्थिरतेच्या काळात आजही सोने ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जात आहे. भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेने सुवर्ण साठा वाढविल्यामुळे सोन्यावरील विश्वास अधिक झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका- इराण युद्धामुळे इंधनपुरवठ्यावर होत असलेल्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी नागरिकांना इंधन व परकीय चलन बचतीसाठी काही उपाय सुचविले आहेत. पेट्रोल-डिझेल व गॅसचा गरजेनुसार वापर करणे, शक्य असल्यास घरातून काम करणे, ऑनलाइन बैठका घेणे, परदेश प्रवास टाळणे, तसेच शेतात डिझेलपंपाऐवजी सोलरपंपाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सोन्याचे दर कोसळणार अशा आशयाचे रील्स व्हायरल होत आहेत. असे रील्स, चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सराफ व्यावसायिक चेतन राजापूरकर यांनी केले आहे.
सोन्याचे दर हे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर ठरत असतात. त्यामुळे सोन्याचे दर कोसळणार किंवा वाढणार असे गैरसमज न करता तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सोनेखरेदी करावी, असे आवाहन सराफ व्यावसायिकांनी केले आहे.
Confusion over statement to avoid buying gold