पंचवटी : प्रतिनिधी
मखमलाबाद रस्त्यावर फडोळ मळाजवळील गंगापूर कॅनॉलवरील वळणावर गॅस सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची मंगळवारी (दि. 12) रात्री घडली.
सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, गॅस सिलिंडर रस्त्यावर व पाटाजवळ खड्ड्यात पडले होते.सदर घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचार्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. बुधवारी (दि. 13) दुपारी क्रेनच्या सहाय्याने उलटलेला ट्रक उभा करण्यात आला. घरगुती गॅश सिलिंडर वाहतूक करणारा आयशर ट्रक (एमएच15-एचएच 3565) फडोळ मळा गंगापूर कॅनॉल रस्त्याने जाताना चालकाला अंदाज न आल्याने ट्रक मागे घेण्याच्या प्रयत्नात उलटला. त्यानंतर सिलिंडर रस्त्यावर पडले. या घटनेत चालक किरकोळ जखमी झाल्याचे समजते.
दरम्यान, याठिकाणी अग्निशमन दलाची गाडीदेखील पाचारण करण्यात आली होती. ट्रक उलटल्यामुळे या रस्त्याने गंगापूरकडे जाणार्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या श्याम सुरेश जाधव (वय 57, रा. दिंडोरी) याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई भूषण साळवे यांनी फिर्याद दाखल केली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तू शेळके तपास करीत आहेत.
Truck transporting gas cylinders overturns on Gangapur Canal