युवकावर जीवघेणा हल्ला, वाहनांची तोडफोड
सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुभम पार्क परिसरात कोयता गँगने मध्यरात्री धुडगूस घालत युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केला तसेच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
सिडको परिसरातील शुभम पार्क येथे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा कोयता गँगचा धुमाकूळ पाहायला मिळाला. मध्यरात्रीच्या सुमारास काही युवकांनी हातात कोयते, लोखंडी रॉड आणि दांडके घेऊन परिसरात दहशत निर्माण करत वाहनांची तोडफोड केली. तसेच एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ
उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल राजेंद्र बिडलान (वय 30, रा. शुभम पार्क) हे गुरुवारी रात्री घराबाहेर बसले होते. त्यावेळी त्यांचा परिचित साहिल हिरे हा मोबाइलवर मोठमोठ्याने शिवीगाळ करत तेथे आला. परिसरात अशा प्रकारे शिवीगाळ करू नये, असे राहुल यांनी सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. यानंतर साहिल हिरे याने धमकी देत तेथून निघून गेला.
त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री साहिल हिरे, सोमनाथ सोनवणे, दत्ता सोनवणे आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी शुभम पार्क परिसरात धडक दिली. संशयितांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन ते चार चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच राहुल बिडलान यांच्यावर धारदार शस्त्राने छातीवर वार करत मारहाण केली. या हल्ल्यात राहुल जखमी झाले असून, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
अंबड परिसरात वाढती कोयता गँगची दहशत
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. किरकोळ कारणांवरून शस्त्रांचा वापर, मारहाण आणि वाहनांची तोडफोड अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक कमी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या टोळ्यांवर कठोर कारवाई करून परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Koyata gang attacks Uttamnagar