पत्नी रक्ताच्या थारोळ्यात, तर पतीने घेतला गळफास

यशोदाबाई मुरलीधर ठाकरे मुरलीधर राघो ठाकरे
नामपूर : वार्ताहर
बागलाण तालुक्यातील श्रीपूरवडे येथे शेतकरी दाम्पत्याचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यशोदाबाई मुरलीधर ठाकरे (वय 60) आणि मुरलीधर राघो ठाकरे (वय 70) यांच्या मृत्यूची नोंद जायखेडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 14 मे रोजी ठाकरे कुटुंबात विवाह सोहळा असल्याने कुटुंबीय बाहेर गेले होते. यावेळी मुरलीधर ठाकरे आणि यशोदाबाई ठाकरे घरीच होते. विवाह सोहळ्यानंतर मुलगा व मुलगी घरी परतल्यानंतर दरवाजा उघडताच यशोदाबाई यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, यशोदाबाई यांच्या मृत्यूनंतर पती मुरलीधर ठाकरे यांनीही जवळील झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत दाम्पत्यामागे एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. या दुहेरी मृत्यूमुळे श्रीपूरवडेत भीतीचे वातावरण
पसरले आहे.
Suspicious death of elderly couple in Sripurwade