सिडको : विशेष प्रतिनिधी
परिसरातील प्रमुख चौकांमधील दिशादर्शक कमानींवर वाढलेल्या अनधिकृत बॅनर्समुळे वाहनचालकांना दिशादर्शनात अडचणी येत असल्याची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने विशेष मोहीम राबवली. त्रिमूर्ती चौक आणि उंटवाडी परिसरात कारवाई करत अनेक बॅनर्स हटविण्यात आले. सिडको परिसरासह शहरातील प्रमुख चौकांमध्ये उभारण्यात आलेल्या दिशा दर्शविणार्या कमानींवर अनधिकृत बॅनर्स लावण्याचे प्रमाण वाढल्याने शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असून, वाहनचालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत बॅनर्सविरोधात विशेष मोहीम हाती घेत कारवाई सुरू केली आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार तसेच अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या सूचनेनुसार नवीन नाशिक विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्ती चौक आणि उंटवाडी परिसरात विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान दिशा दर्शविणार्या कमानींवर लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर्स हटविण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून विविध राजकीय, सामाजिक तसेच खासगी कार्यक्रमांच्या जाहिरातींसाठी या कमानींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. त्यामुळे दिशादर्शक फलक झाकले जाऊन वाहनचालकांना योग्य दिशेची माहिती मिळण्यात अडथळे निर्माण होत होते. विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेरगावाहून येणार्या वाहनचालकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत होता. याची गंभीर दखल घेत अतिक्रमण विभागाने तातडीने मोहीम राबवत त्रिमूर्ती चौक आणि उंटवाडी परिसरातील कमानींवरील बॅनर्स हटविले. कारवाईनंतर दिशा दर्शविणारे फलक पुन्हा स्पष्ट दिसू लागल्याने वाहनचालक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या कारवाईत समन्वय पथकप्रमुख निखिल तेजाळे, वाहनचालक उमेश इंगळे तसेच अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्यांनी सहभाग घेतला. महापालिकेच्या या कारवाईमुळे शहरात अनधिकृत बॅनर्स लावणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Municipal Corporation’s campaign to remove unauthorized banners on directional arches