पुणेगाव धरणातील गाळ काढण्याच्या कामाला भेट
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत संजीवनी फाउंडेशन या बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणातील गाळ काढण्याचे काम प्रगतीत आहे. या योजनेमुळे धरणाची जलसाठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असून, परिसरातील शेतकर्यांनाही सुपीक गाळ उपलब्ध होणार असल्याने शेती उत्पादनवाढीस चालना मिळणार आहे.
धरणातील साचलेला गाळ काढल्यामुळे पावसाळ्यात अधिक पाणी साठवता येणार असून, जलसंवर्धनाच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. धरणातून काढण्यात येणारा गाळ शेतकर्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पीक उत्पादनात सकारात्मक बदल अपेक्षित आहे. स्थानिक प्रशासन, मृद व जलसंधारण विभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून हे काम सुरू करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. ’गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना जलस्रोतांचे संवर्धन आणि शाश्वत शेतीविकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या कामामुळे धरणाचे आयुष्य वाढण्याबरोबरच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होईल, असा विश्वास प्रादेशिक जलसंधारण अधिकारी इंजि. हरिभाऊ गिते यांनी व्यक्त केला. शेतकर्यांना गाळ मोफत काढून देण्यासोबतच हेक्टरी 35 हजार रुपये अनुदान मिळणार असल्याने शेतकरी बांधवांना गाळ घेऊन जावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागामार्फत करण्यात आले आहे. पुणेगाव धरणातील गाळ काढण्याचा प्रकल्प जलव्यवस्थापन आणि कृषी विकासाचा आदर्श निर्माण होणार आहे. या धरणातून 136038 सघमी गाळ काढण्यात येणार असून, यामधून 136 हेक्टर जमीन सुपीक होणार आहे. यावेळी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी इंजि. हरिभाऊ गिते, प्रदीप लोधे, उपअभियंता पुणेगाव धरण प्रकल्प, केदू वाघ, सरपंच माळेदुमाला, रवि काकड, सागर गायकवाड, अमोल काकड, कीर्ती जायभाये यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Silt-free dam will be a boon for water conservation: Haribhau Gite