नागरिक त्रस्त; आंदोलनाचा इशारा
सिडको : प्रतिनिधी
नाशिक महापालिका हद्दीतील खोडेनगर, विधातेनगर परिसरात वारंवार खंडित होणारा व कमी दाबाने होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली. पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजना न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
खोडेनगर, विधातेनगर परिसरात सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, वारंवार होणार्या वीज खंडित प्रकारांमुळे संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता पानसरे यांची भेट घेत निवेदन सादर केले. परिसरात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने तसेच कमी दाबाने वीज मिळत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरांमधील विद्युत उपकरणे वारंवार बंद पडत असून, त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. ‘वर्क फ्रॉम होम’ करणार्या नागरिकांचे कामकाजही विस्कळीत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
श्रीकलश अपार्टमेंटपासून येणारी विद्यमान वीज केबल अपुरी क्षमतेची असल्याने तिच्या जागी नवीन व अधिक क्षमतेची केबल टाकणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली. परिसरात अनेकदा 12 ते 24 तास वीजपुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांना उकाडा आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती व तांत्रिक कामे तातडीने पूर्ण करून नियमित आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे; अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी तुकाराम शिरोडे, जगन्नाथ शिरसाट, सुरेंद्र पवार, रमाकांत बडे आणि पंकज गोरे उपस्थित होते.
Electricity scam at CIDCO