पावसाळापूर्व कामे गुणवत्तापूर्णच व्हावीत

आयुक्तांच्या सक्त सूचना; शहरात 211 ठिकाणी पाणी साचणारे स्पॉट

नाशिक : प्रतिनिधी
पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. शहरात सुरू असलेल्या रस्तेदुरुस्ती व विकासकामांमुळे अनेक ठिकाणी पावसाळी जलवाहिनी कक्षांत माती व बांधकाम साहित्य साचल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातल्या विविध भागांत 211 क्रॉनिक स्पॉट आढळून आले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी याकरिता प्रशासन प्रयत्न करत आहे. दरम्यान आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्व विभागांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी होणारी कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, अशा स्पष्ट व कडक सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त खत्री यांनी संबंधित विभागांची विशेष बैठक घेत शहरातील सर्व पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. नालेसफाई, पावसाळी आरसीसी, पाइप गटारांची स्वच्छता, खुल्या बांधकाम गटारांची साफसफाई, तसेच शहरातील क्रॉनिक फ्लडिंग स्पॉट्सवरील पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी नियोजनबद्ध कामे सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
पावसाळ्यात रस्त्यांवर साचणार्‍या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी महापालिकेकडून पावसाळापूर्व कामाला सुरवात केली आहे. दरम्यान, महापालिकेने शहरातील पाणी साचण्याच्या 211 क्रॉनिक स्पॉट्सची ओळख पटवली असून, पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. या भागांत पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून नालेसफाई, रस्तेदुरुस्ती आणि पाणी साचण्याच्या समस्यांबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली जात असताना महापालिकेने पावसाळापूर्व कामांसाठी अखेर प्रयत्न सुरू केले आहेत.
नंदिनी नदी सफाई आणि रस्तेदुरुस्तीबाबत महापालिकेने संबंधित विभागांना अधिक गतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या विभागामार्फत शहरातील नालेसफाई व गटार स्वच्छतेची मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही महापालिकेकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. औषध फवारणी, स्वच्छता मोहीम आणि आरोग्य विभागामार्फत आवश्यक कामांना वेग देण्यात आला आहे. महावितरणमार्फत शहरात फांद्यांची छाटणी व पावसाळ्यापूर्व देखभाल कामे सुरू आहेत. त्यामुळे काही भागांत तात्पुरता वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पाणी साचण्याची
विभागवार संख्या
नाशिक पूर्व            26
नाशिक पश्चिम     24
पंचवटी                 24
नाशिकरोड           39
नवीन नाशिक      67
सातपूर                31
एकूण                  211

पावसाळी नाले साफ करावयाची एकूण लांबी : 50,926
पावसाळी आरसीसी पाइप गटारीवरील एकूण कक्ष संख्या : 13,946
पावसाळी खुली बांधकाम गटार साफ करावयाची एकूण लांबी :  58,048

Pre-monsoon works should be of high quality

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *