राष्ट्रपती भवनात रंगला पद्म पुरस्कार सोहळा

राज्यातील 15 मान्यवरांचा गौरव, धर्मेंद्र यांना मरणोत्तर ’पद्मविभूषण’

नवी दिल्ली : प्रतिनिधी
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या ’पद्म पुरस्कार 2026’ चे सोमवारी राष्ट्रपती भवनातील अत्यंत दिमाखदार सोहळ्यात वितरण करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील विविध क्षेत्रांत अद्वितीय योगदान देणार्‍या दिग्गजांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या राष्ट्रीय सोहळ्यात यंदा महाराष्ट्राचे नाव विशेषत्वाने चमकले आहे.
राज्यातील 15 मान्यवरांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये कला, क्रीडा, उद्योग, वैद्यकीय आणि समाजसेवा क्षेत्रातील नामवंतांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी सर्वोच्च ’पद्मविभूषण’ पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला, हा पुरस्कार त्यांची पत्नी खासदार हेमा मालिनी यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला. याशिवाय संगीत क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी प्रसिद्धगायिका अलका याज्ञिक आणि जाहिरात व कला क्षेत्रातील योगदानासाठी पीयूष पांडे (मरणोत्तर) यांना ’पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराष्ट्राला मिळालेल्या या एकूण 15 बहुमानांमध्ये 11 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात तळमळीने काम करून राज्याचा नावलौकिक वाढवला. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाला टी-20 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन (माधवन रंगनाथन) यांना क्रीडा व कला क्षेत्रातून ’पद्मश्री’ प्रदान करण्यात आला. तसेच उद्योग क्षेत्रातून ’कोटक महिंद्रा’चे उदय कोटक आणि ज्येष्ठ उद्योजक अशोक खाडे यांना गौरविण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी डॉ. आर्मिडा फर्नांडिस आणि विज्ञान क्षेत्रातून जुझर वासी यांचा सन्मान झाला. समाजसेवेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांचे जीवन बदलणारे जनार्दन बापूराव बोथे, लोककलेचा वारसा जपणारे रघुवीर तुकाराम खेडकर, भिकल्या लाडक्या ढिंडा आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे श्रीरंग देवाबा लाड यांनाही राष्ट्रपतींच्या हस्ते ’पद्मश्री’ देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांमुळे महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक वैभवावर पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
देशभारतील मान्यवरांचाही सन्मान
महाराष्ट्राव्यतिरिक्त देशभरातील अनेक अशा अष्टपैलू आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तींना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मल्याळम सिनेसृष्टीचे सुपरस्टार ममूटी यांना त्यांच्या प्रदीर्घ अभिनय प्रवासासाठी ’पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रविण कुमार यांना ’पद्मश्री’ने गौरविण्यात आले. यासोबतच बंगाली चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते प्रसेनजित चॅटर्जी, ’अनुपमा’ मालिकेतील बाबूजींच्या भूमिकेसाठी लोकप्रिय असलेले अरविंद वैद्य आणि विनोदी अभिनेते सतीश शाह (मरणोत्तर) यांचाही कला क्षेत्रातील योगदानासाठी गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातून युजीसीचे माजी अध्यक्ष मामिडाला जगदेश कुमार आणि पत्रकारितेतून ज्येष्ठ पत्रकार कैलाश चंद्र पंत यांना ’पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या या सर्व नायकांनी भारत मातेच्या प्रगतीत दिलेल्या अमूल्य योगदानाचा हा देशपातळीवरील मोठा सन्मान ठरला आहे.

 

 

Padma Awards ceremony held at Rashtrapati Bhavan

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *