डोंगरची ‘काळी मैना’ बाजारात दाखल

करवंद विक्रीतून आदिवासी बांधवांना रोजगार

ठाणगाव : वार्ताहर
सिन्नर व अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरील पट्टा किल्ला तथा विश्रामगड परिसरात आढळणारी डोंगरची ‘काळी मैना’ म्हणून प्रसिद्ध असलेली करवंदे आता बाजारात दाखल झाली आहे. रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.
सध्या सिन्नर, अकोले, इगतपुरी, तसेच
घाटमाथ्यावरील जंगल परिसरात करवंदांचा हंगाम सुरू झाला आहे. आदिवासी बांधवांसाठी हा महत्त्वाचा रोजगाराचा आधार ठरत आहे. पट्टा किल्ला, पट्टेवाडी, माळुंगी, शिवाजीनगर, तिरडे आदी भागातील आदिवासी महिला व पुरुष पहाटेपासून जंगलात जाऊन काटेरी झुडपांमधून करवंदे गोळा करतात. दिवसभर मेहनत करून तोडलेली करवंदे दुसर्‍या दिवशी बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणली जातात. सध्या नाशिक, सिन्नर, घोटी, इगतपुरी तसेच परिसरातील गावांमध्ये करवंदे शंभर ते सव्वाशे रुपये किलो दराने विकली जात आहेत.
पट्टेवाडी येथील पार्वताबाई बंडू गोडे आणि त्यांचा मुलगा काळू बंडू गोडे गेल्या काही दिवसांपासून ठाणगाव, पाडळी, टेंभूरवाडी, हिवरे परिसरात करवंद विक्री करत आहेत. दहा ते वीस रुपये ग्लास या दराने विक्री होत असून एका दिवसात हजार ते बाराशे रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दुपारनंतर पुन्हा जंगलात जाऊन करवंद तोडण्याचे काम सुरू होते. त्यामुळे या हंगामात अनेक आदिवासी कुटुंबांना रोजगार उपलब्ध होत आहे. चैत्र महिन्याच्या सुरुवातीपासून करवंदांचा हंगाम सुरू होतो, तर वैशाख महिन्यात ही करवंदे पूर्णपणे पिकतात. गोड-आंबट चवीमुळे करवंदांना मोठी मागणी असते. पट्टा किल्ला परिसरात येणार्‍या पर्यटकांनाही झाडाच्या पानांच्या द्रोणात भरून दहा ते पंधरा रुपयांत हा रानमेवा विकला जातो. मात्र, बाजारपेठेत पोहोचताच त्याचे दर वाढताना दिसतात. दरम्यान, जंगल क्षेत्र कमी होत चालल्याने करवंदाच्या झाडांनाही धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी जंगलांना लागणार्‍या आगीमुळे करवंदाच्या झुडपांचे नुकसान होत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली. जंगलांचे संवर्धन झाले नाही तर भविष्यात हा नैसर्गिक रानमेवा दुर्मिळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

The sale of ‘black maine’ from the mountains has given employment to tribal brothers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *